या क्रिकेटपटूंनी निवृत्तीच्या घोषणेनंतर पुन्हा केले पुनरागमन


भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने भावूक होऊन निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याला त्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतण्याचा निर्धार त्याने केला आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (एचसीए) पत्र लिहून आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचे 33 वर्षीय रायडूने सांगितले आहे. रायडूने विश्वचषकात निवड न झाल्यानंतर अचानक निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

रायडूने एचसीएला निवृत्तीचा निर्णय परत घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे, अशा आशयाचे पत्र लिहिले. मी चेन्नई सुपरकिंग्ज, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नोएल डेविड यांचे आभारी आहे. कठीण काळात त्यांनी मला साथ दिली आणि मी अजून क्रिकेट खेळू शकतो याची जाणिव करुन दिल्याचेही त्याने म्हटले आहे. आज आम्ही तुम्हाला निवृत्तीचा निर्णय परत घेणाऱ्या काही क्रिकेटपटूंची माहिती सांगणार ज्यांनी निवृत्तीच्या निर्णयानंतर आपला विचार बदलत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले.

रायडू हा निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मैदानाची ओढ लागलेला पहिलाच क्रिकेटर नाही. दिग्गज खेळाडूंच्या नावाचा यामध्ये समावेश होतो. याचे ताजे उदाहरण आहे पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी. 2006 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. पण तो 2010 मध्ये कर्णधार म्हणून परतला आणि पुन्हा एकदा निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय 2011 च्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघातच वाद होते. प्रशिक्षक वकार युनूस यांच्यासोबतच्या मतभेदानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, पण पुन्हा एकदा परत आला आणि 2015 चा विश्वचषकही खेळला.

झिम्बाम्ब्वेचा क्रिकेटर ब्रेंडन टेलरने 2015 च्या विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर केली आणि नॉटिंघमशायरशी करार केला. पण 2017 मध्ये तो पुन्हा देशाकडून खेळण्यासाठी परतला.

केनियाच्या स्टीव्ह टिकोलोच्या नावावर निवृत्तीनंतर वयाच्या 42 व्या वर्षी संघासाठी परतण्याचा विक्रम आहे. कारण, केनिया संघ सर्वात जास्त टिकोलोवर अवलंबून होता, ज्यामुळे त्याला परतण्यासाठी विनंती करण्यात आली. त्याने 23 जानेवारी 2014 रोजी नेदरलँडविरुद्ध अखेरचा सामना खेळला.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसननेही निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. त्याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी 2011 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण काही महिन्यातच तो माघारी परतला.

1999 च्या विश्वचषकाच्या तीन आठवडे अगोदर वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर कार्ल हूपर यांनी निवृत्तीची घोषणा केली. पण त्याने 2001 मध्ये पुन्हा पुनरागमन केले आणि 2003 च्या विश्वचषकात संघाचे नेतृत्त्वही केले.

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांना क्रिकेटच्या इतिहासात निवृत्तीनंतर परत येऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा मान जातो. इम्रान खान यांनी 1987 च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली. पण त्यानंतर वयाच्या 39 व्या वर्षी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया उल हक यांच्या विनंतीमुळे इम्रान खानने पुन्हा एकदा 1992 च्या विश्वचषकात पुनरागमन केले आणि संघाला विश्वचषक जिंकून दिला.

पाकिस्तानमध्ये निवृत्ती घेऊन परत येण्याची परंपरा नवी नाही. जावेद मियादाद यांनी निवृत्तीच्या घोषणेनंतर 1996 चा विश्वचषक खेळण्यासाठी पुन्हा पुनरागमन केले होते.

Leave a Comment