या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आदित्य ठाकरे ?


मुंबई – वरळी येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात गटप्रमुखांनी युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली. शिवसेना नेते अनिल परब यांनी या मागणीवर शिक्कामोर्तब करत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीतूनच झाला पाहिजे. तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असे त्यांनी म्हटले.

शिवसेनेचा वरळी विधानसभा मतदारसंघ हा ए प्लस मतदारसंघ असल्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारे मतदार संघातील दिग्गज या एका मंचावर उपस्थित असल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी येथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचे निश्चित करावे, असे मत अनिल परब यांनी भाषणात व्यक्त केले. तसेच वरळी येथे शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश देखील देण्यात आल्यामुळे सर्व इतर पक्षाचे शिवसेना डिपॉझिट जप्त करू शकते, अशी पार्श्वभूमी आता वरळी विधानसभेची झाली आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री विधानसभेत या मतदारसंघातून व्हायचा असेल तर 145 जागा जिंकायला हव्या. आदित्य ठाकरे यांना त्यासाठी या विधानसभेत अडकवून न ठेवता त्यांना महाराष्ट्रात प्रचार करून देत प्रत्येकाने आदित्य ठाकरे होऊन मतदाराकडे गेले पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्यासारखा कमी वयाचा चेहरा निवडणुकीत उतरल्यास व उद्धव ठाकरे यांनी त्यांना परवानगी दिल्यास ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल आणि याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागेल. आदित्य ठाकरे सिनेटच्या निवडणुकीत उतरले तेव्हा 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आताही ते जिंकून वेगळा करिष्मा घडवतील, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी अनिल परब यांच्या मागणीचे स्वागत केले. आदित्य ठाकरेंना 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला. या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, शिवसेना नेते अनिल परब, आमदार सुनिल शिंदे आणि माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते.

Leave a Comment