समीक्षकांनी नाकारल्यानंतरही ‘साहो’ची बक्कळ कमाई


काल बॉक्स ऑफिसवर प्रभास व श्रद्धाची मुख्य भूमिका असलेला ‘साहो’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. पहिल्या दिवशी ३५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दिवशी तब्बल ६८ कोटी रुपये हिंदी, तेलुगू, तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ने कमावले आहेत. तर २४.४० कोटी रुपयांचा गल्ला फक्त हिंदी भाषेतील चित्रपटाने जमवला आहे.


चित्रपटाच्या कमाईबाबत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘साहो’ची फक्त भारतातील कमाई पाहिल्यास २०१९ या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर ‘भारत’ तर दुसऱ्या क्रमांकावर ‘मिशन मंगल’ आहे. प्रभास व श्रद्धासोबतच ‘साहो’ चित्रपटात नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक सुजीतने केले आहे.


‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ व ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या दोन चित्रपटांना पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘साहो’ने मागे टाकले आहे. प्रभास ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाच्या दोन वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत.

Leave a Comment