देशाची अर्थव्यवस्था ‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्यांमुळेच डबघाईला


नवी दिल्ली – आर्थिक विकास दराच्या (जीडीपी) घसरणीवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था ‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या भाजपनेच पंक्चर केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रियंका गांधी यांनी देशाच्या विकास दराच्या घसरणीवरून अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था दिसून येत आहे. आर्थिक विकास दरात वाढ नाही, रूपयाचे मूल्यही घसरत आहे तर रोजगारही गायब आहेत, अशा आशयाचे ट्विट केले आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या बिकट अवस्थेसाठी जबाबदार कोण आहे हे आतातरी स्पष्ट करा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.


५ टक्क्यांवर वित्तीय वर्ष २०१९-२० मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील देशाचा विकास दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) स्थिरावताना सहा वर्षांच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. दरवाढीला निर्मिती आणि कृषी क्षेत्रातील संथ हालचालीमुळे आळा बसला आहे. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन यापूर्वी किमान ४.३ टक्के अशा प्रमाणात जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान नोंदले गेले होते. यंदाचा दर वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील तब्बल ८ टक्क्यांच्या तुलनेत थेट ३ टक्क्यांनी खालावला आहे.

Leave a Comment