युट्युबमुळे गुगलला सुमारे १४०० कोटींचा दंड


वॉशिंग्टन – अमेरिकेत इंटरनेट कंपन्यांकडून वैयक्तिक गोपनीयतेचा भंग झाल्यास मोठा आर्थिक दंड करण्याची कायदेशीर तरतूद असून युट्यूबची मालकी असलेल्या गुगलला याच कायद्याचा बडगा बसणार आहे. १ हजार ते १४०० कोटींचा दंड (१५० ते २०० दशलक्ष डॉलर) दंड ठोठावण्याची तयारी अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापारी आयोगाने सुरू केली आहे.

अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापारी आयोगाने (एफटीसी) तोडगा म्हणून गुगलला १ हजार ते १४०० कोटींचा दंड निश्चित केला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाची या दंडाला मंजुरी लागणार आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर लहान मुलांच्या माहितीच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणीचा सर्वात मोठा दंड ठरणार आहे.

१३ वर्षापर्यंतच्या मुलांच्या माहिती घेवून गुगलने गोपनयीतेचा भंग केल्याचा आरोप युट्युबविरोधात करण्यात आला आहे. योग्य व्यक्तीपर्यंत जाहिराती पोहोचविण्यासाठी लहान मुलांचा वैयक्तिक डाटा घेतल्याचे आरोपात म्हटले आहे. एफटीसीकडून सप्टेंबरमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुलांना हानिकारक व्हिडिओपासून दूर ठेवण्यात गुगल अपयशी ठरल्याचा एफटीसीने ठपका ठेवला आहे. याबाबत गुगलला ठोठावलेला दंड खूपच कमी असल्याची प्रतिक्रिया सेंटर फॉर डेमॉक्रसीने दिली आहे.

गुगल ही अल्फाबेट कंपनीचे सर्च इंजिन आहे. या कंपनीचे बहुतांश उत्पन्न हे डिजिटल अॅडमधून येते. गुगलला फ्रान्सच्या सीएनआयएल या नियामक संस्थेने ५० दशलक्ष युरोचा दंड ठोठावला होता. गुगलने यावर अपील दाखल केले आहे. नुकतेच एफटीसीने फेसबुकला वैयक्तिक माहितीचा दुरपयोग केल्याप्रकरणी ५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे.

Leave a Comment