पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करणार नारायण राणे


मुंबई – पुढील महिन्याच्या एक तारखेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करुन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राणे यांनी स्वतः आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बेस्ट कामगारांच्या उपोषणाला राणे यांनी भेट दिली. राणे यांनी या भेटीदरम्यान भाजपमध्ये प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लवकरच भाजपमध्ये नारायण राणे हे प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. याचवेळी आपला पक्ष (स्वाभिमान पक्ष) देखील भाजपमध्ये नारायण राणे हे विलीन करणार आहेत. याबाबतचे संकेत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी याबाबतचे संकेत दिले होते. यावेळी बोलताना, राणेंनी मला त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे निमंत्रण दिले होते. पण त्या कार्यक्रमाला जाणे मला शक्य झाले नाही. पण असे असले तरीही नारायण राणे हे आमच्यासोबतच आहेत.

राज्यसभेत भाजपच्याच तिकीटावर राणे हे खासदार असल्यामुळे ते आता आपला पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करणार असल्यास त्यांचे भाजपकडून स्वागतच केले जाईल. आम्ही सर्व घटक पक्षांना भाजपमध्ये घेऊ, त्यांनी काळजी करु नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर राणे यांनी आपण भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले असल्यामुळे येत्या १ सप्टेंबरला राणे आपला पक्ष विलीन करुन भाजपत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment