पाकच्या माकडचेष्टा; बनवणार अभिनंदन यांच्यावर कॉमेडी चित्रपट


अभिनेता विवेक ओबेरॉयने काही दिवसापूर्वी बालाकोट आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले होते. विवेक या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनंदन यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखविणार आहे. पण आता दूसरीकडे कलम 370 रद्द केल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानने बॉलिवूडच्या या निर्णयानंतर आता अभिनंदन यांच्यावर आधारित एका विनोदी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

भारतीय हवाई दलाने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाक व्याप्त काश्मीरमध्ये हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपले मिग २१ विमान त्यावेळी पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. पण वर्धमान हे त्या परिस्थितीमध्येही खंबीर आणि तेवढ्याच निडरतेने उभे राहिल्यामुळेच अभिनंदन यांच्या जीवनावर आणि बालाकोटवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय अभिनेता विवेक ओबेरॉय घेतला. विवेकने यासाठी हवाईदलाकडून चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकारही मिळविले आहेत. पण आता अभिनंदन यांच्यावर आधारित विनोदी चित्रपट निर्मिती करण्याचा घाट पाकिस्तानने घातला आहे.

याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन पाकिस्तानी लेखक खलिल-उर-रहमान-कमर करणार असून तेच चित्रपटाची कथादेखील लिहिणार आहेत. “अभिनंदन कम ऑन” असे अभिनंदन यांच्यावर आधारित या विनोदीपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. तर या चित्रपटामध्ये अभिनेता शमूम अब्बासी हा अभिनंदन यांची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अद्याप तरी या चित्रपटाबाबतची माहिती समोर आली नसली तरीदेखील या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सप्टेंबरमध्ये सुरुवात करण्यात येणार असून २७ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट पाकिस्तानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment