हॉकी प्रशिक्षकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप


कोल्हापूर – राज्यस्तरीय हॉकीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या अल्पवयीन खेळाडूंवर बलात्कार करणाऱ्या नराधम प्रशिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जन्मठेप झालेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव विजय मनुगडे असे आहे. मुलींसोबत लैंगिक चाळे करुन एका मुलीवर आरोपी प्रशिक्षकाने बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. त्याने या मुलींवर मे 2017 मध्ये अत्याचार केला होता. आरोपीने या मुलींना झालेला प्रकार बाहेर सांगितल्यास खेळ बंद करुन बदनामी करण्याची धमकीही दिली होती. कोल्हापूरमधील शाळेत या सर्व मुली शिकत होत्या.

हा नराधम शिक्षक कोल्हापूरच्या एका शाळेमध्ये ८ वर्षांपासून क्रीडा प्रशिक्षक पदावर काम करीत होता. आरोपी प्रशिक्षक मनुगडे हा हॉकीचे प्रशिक्षण देताना पीडित मुलींचा वेळोवेळी विनयभंग करत असे. एका मुलीस खेळासाठी लागणारे कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने राहत्या घरी नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने त्याचबरोबर शाळेतील वरच्या मजल्यावरील एका खोलीत दोन ते तीन वेळा बलात्कार केला होता. या मुलीबरोबर स्वत:चे अश्लील फोटो आरोपीने मोबाईलवर काढून हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तुझी बदनामी करीन, शिवाय खेळ बंद करेन. अशी धमकी दिली होती. १ मे ते १६ ऑगस्ट २०१७ च्या कालावधीत हा प्रकार घडला होता. याचबरोबर शाळेतीलच आणखी तीन अल्पवयीन मुलींचा सुद्धा त्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी मंगळवारी नराधम प्रशिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Leave a Comment