ट्वीटरवर सध्या धमाल उडवत आहे ‘गुलाबजामुन की सब्जी ‘ !


आजकालच्या बदलत्या काळासोबत भारतातील लोकांच्या खाण्या-पिण्याच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत, आणि म्हणूनच भारतीय खाद्यपरंपराही झपाट्याने बदलत चालली आहे. जिथे आईसक्रीम म्हटल्यावर आंबा, पिस्ता, चॉकोलेट हे ठरलेले फ्लेवर्स चाखणारी मंडळी आता काकडीचे आईस्क्रीम पसंत करू लागली आहेत, तर काहींना ‘ओनियन हलवा’ही खुश करून जात आहे. आजकाल खाद्यपदार्थांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे वैविध्य पहावयास मिळत आहे. केवळ खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धीतच नाही, तर ते ज्या प्रकारे ‘प्रेझेंट’ केले जातात, त्या पद्धतीही आता बदलल्या आहेत. यापैकी बहुतेक पदार्थांना खवय्यांकडून पसंतीची पावती मिळत असली, तरी खाद्यपदार्थांमधील वैविध्याच्या नावाखाली क्वचित काही अजब पदार्थही पहावयास मिळतात.

अलीकडेच सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये दर्शविलेल्या ‘ब्लॅक पेपर आईस्क्रीम’ नामक चमत्कारापासून नेटीझन्स स्वतःला सावरत आहेत, तोच एका ट्वीटर युझरने ‘गुलाबजामुन की सब्जी’ ची छायाचित्रे ट्वीटरवर प्रसिद्ध करून ट्वीटराटीला आणखी एक धक्का दिला आहे. ‘गुलाबजामुन की सब्जी’ पाहून नेटकरी मंडळी चांगलीच अचंबित झाली आहेत.

अलीकडेच एका ट्वीटर युझरने गुलाबजामाच्या भाजीची छायाचित्रे ट्वीटरवर प्रसिद्ध केल्यानंतर, या छायाचित्रांच्या संदर्भातील नेटीझन्सच्या अनेक धमाल प्रतिक्रिया ट्वीटरवर पहावयास मिळत आहेत. ‘या पदार्थामध्ये ना भाजी खायला मिळाली, ना गुलाबजाम’ अश्या प्रतिक्रियेपासून, ‘आता कारल्याचा शिराही लवकरच बनविला जाणार’ इथवर अनेक प्रतिक्रिया ट्वीटरवर पहावयास मिळत आहेत.

Leave a Comment