दातदुखीने हैराण आहात का? मग आजमावा ही होमियोपॅथीतील औषधे


दातदुखी अगदी थोड्याफार प्रमाणात असली, तरी ती देखील अस्वस्थ करणारी असते. किंचितश्या दातदुखीमुळे कोणत्याही गोष्टीवर चित्त एकाग्र करणे अवघड होऊन बसते. काहीही खाता-पिताना होणारा त्रास आणखी वेगळा असतोच. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात दातदुखीला तोंड द्यावेच लागत असते. मात्र दातदुखी उद्भविण्याची कारणे निरनिराळी असू शकतात. दातांना लागलेली कीड, हिरड्यांवरील सूज, किंवा दाताचा काही भाग मोडल्याने तिथे झालेले संक्रमण अश्या निरनिराळ्या कारणांमुळे दातदुखी उद्भवू शकते. दातदुखी कमी करण्यासाठी त्यामागील कारणांचे नेमके निदान करून त्यावर उपाय दंतचिकित्सकाच्या सल्ल्याने उपचार करणे योग्य असले, तरी अकस्मात दातदुखी उद्भवून त्वरित दंतचिकित्सकाकडे जाणे शक्य नसल्यास तात्पुरत्या उपायांनी दातदुखी कमी करता येऊ शकते. यावर होमियोपॅथीची औषधे उत्तम लागू पडत असतात. त्यामुळे ही औषधे घरामध्ये नक्की असावीत.

प्लांटागो हे औषध दातदुखी आणि अतिसंवेदनशील दात या दोन्हीवर अतिशय उपयुक्त आहे. तसेच गालाच्या आतील बाजूस सूज येऊन दात दुखत असल्यास, किंवा तोंडामध्ये लाळ अतिरिक्त प्रमाणात तयार होत असल्यासही हे औषध दिले जाते. हे औषध पाण्यामधून घेतले जाऊ शकते, किंवा दुखऱ्या दातावर वेदना कमी करण्यासाठी लावले जाऊ शकते. सिलिशिया हे औषध दातांच्या मुळाशी संक्रमण होऊन पू झाल्यास, व त्यामुळे दातदुखी उद्भवल्यास त्यावर अतिशय उपयुक्त आहे. हिरड्यांना सूज आल्यासही हे औषध उपयुक्त आहे.

स्टाफीसेग्रिया हे औषध दात अतिसंवेदनशील असल्यास उपयुक्त आहे. ज्यांचे दात अतिसंवेदनशील असतील, त्यांना कोणताही गरम, किंवा गार पदार्थ खाताना अथवा पिताना दातांमध्ये अतिशय वेदना होतात. अश्या वेळी हे औषध उपयुक्त ठरते. तसेच मर्क सोल हे औषध तोंडामध्ये जास्त प्रमाणात लाळ तयार होत असल्यास आणि तोंडातून दुर्गंधी येत असल्यास त्यासाठी उपयुक्त आहे. अतिसंवेदनशीलतेमुळे दातदुखी उद्भवल्यास ती कमी करण्यासाठी देखील हे औषध सहायक आहे.

तसेच हिरड्यांमध्ये संक्रमण झाल्याने त्यातून रक्त येत असल्यास किंवा हिरड्यांमधून दात सैल होऊन हलू लागल्यासही हे औषध उपयुक्त आहे. दाताला कीड लागल्याने अनेकदा दात काढण्याची वेळ येते. अश्यावेळी दात काढला, त्याठिकाणची जखम लवकर भरून येण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी आर्निका हे औषध अतिशय उपयुक्त ठरते. तसेच दातात ‘फिलिंग’ केल्यानंतर दातांमध्ये हलकीशी वेदना जाणवत राहते. त्यासाठी देखील आर्निका उपयुक्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment