‘डबल सीट’नंतर आता ‘ट्रिपल सीट’वर अंकूश चौधरी


यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येणार असून यावेळी तो डबल सीट नव्हे तर चक्क “ट्रिपल सीट’ येणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंटस, अहमदनगर फिल्म कंपनी यांनी संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या पोस्टरवर मध्यभागी बासरी हातात धरलेल्या श्रीकृष्णाच्या पोझमध्ये अंकुश चौधरी दिसत असून दोन अभिनेत्री त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या दिसतात. त्यासोबतच ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असल्याने हा चित्रपट एक रोमँटिक कथानक घेउन येत असल्याचे दिसत असले तरी ही गोष्ट नक्की कुणाच्या प्रेमाची आहे? पोस्टरमध्ये असलेल्या त्यादोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

चित्रपटाला अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत लाभले आहे, तर चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांनी लिहिली आहेत. तगडी स्टारकास्ट, अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment