जाणून घ्या फ्लिपकार्टच्या ‘कंप्लीट मोबाइल प्रोटेक्शन’ प्लानबद्दल


आपल्या संकेतस्थळावरुन नवीन मोबाइल खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवा मोबाइल प्रोटेक्शन प्लान अर्थात सुरक्षा प्लान ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने लाँच केला आहे. ग्राहकांना या प्लानच्या अंतर्गत अधिकृत ब्रँडचे फोन मोफत रिपेअर किंवा बदलून मिळतील. या प्लानची सुरूवात 99 रुपयांपासून असून याचे ‘कंप्लीट मोबाइल प्रोटेक्शन’ असे नाव आहे. फोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसंबंधी तसेच ब्रेकेज आणि लिक्विड डॅमेजच्या समस्या या प्लानमध्ये सोडवल्या जाणार आहेत.

आपल्या या नव्या सेवेद्वारे फ्लिपकार्ट घरपोच डिलिव्हरी देखील उपलब्ध करुन देत आहे. शाओमी, ओप्पो, पोको, रिअलमी, ओप्पो, सॅमसंग, अॅपल, ऑनर, आसुस, इंफिनिक्स आणि अन्य अनेक ब्रँड्ससह या प्लानचा लाभ मिळेल. हा प्लान नवा स्मार्टफोन खरेदी करताना घेता येईल. हा प्लान फोनची डिलिव्हरी होताच सक्रिय होईल आणि त्याची वैधता एक वर्षापर्यंत असणार आहे.

या इन्शुरन्सवर दावा ठोकण्यासाठी 1800 425 365 365 या क्रमांकावर कॉल करुन तुमची पॉलिसी आयडी शेअर करावी लागेल. जर स्क्रीन तुटली असेल किंवा पाण्यामुळे फोन खराब झाला असेल तर तुमच्या इमेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल. यासाठी तुम्हाला 500 रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. फी भरल्यानंतर फोनसाठी पिक अप आणि ड्रॉपची सेवा दिली जाईल, या सेवेचा पहिल्यांदा वापर करणाऱ्यांसाठी ‘पिक अप’ आणि ‘ड्रॉप’ मोफत मिळेल.

पॉलिसीनुसार केवळ एकदाच तुम्ही डॅमेज स्क्रीन किंवा लिक्विड डॅमेजसाठी दावा ठोकू शकता. तुम्हाला दुरूस्तीसाठी दिलेला फोन 10 दिवसांच्या आत परत दिला जाईल. 10 दिवसांमध्ये जर फोन परत मिळाला नाही तर फ्लिपकार्टकडून 500 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळेल.

Leave a Comment