मनसे कार्यकर्त्यांनी ट्रोल केल्यानंतर राज ठाकरेंना अंजली दमानियांचा मेसेज


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीवर प्रतिक्रिया देणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना चांगलेच महागात पडले आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर अंजली दमानिया यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर ट्रोल केले. अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केल्यानंतर मेसेज करुन तक्रार केली. शिवाय याबाबत आपल्याला काय वाटते, असेही विचारले आहे.


नमस्कार, मी सौ. अंजली दमानिया, मी आपल्याविरुद्ध आज एक ट्वीट केले की, आपण ईडीच्या चौकशीला निघालात की सत्यनारायणाच्या पूजेला, यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रोलिंग केले, व्हॉट्सअपवरही पाठवत आहे. आपल्या भाषणात आपणही अनेकदा काहींना अस्वल म्हणता, तर काहींची टिंगल उडवता, मग नुसते एवढे म्हटले तर कुठे बिघडले? लोकशाहीत मी राहते, माझे मत मांडण्याचा मला अधिकार आहे, माझ्यावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल आपल्याला काय वाटते ते कळवावे.. धन्यवाद, असा मेसेज दमानिया यांनी केला. दमानिया यांनी राज ठाकरे यांना मेसेज केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉटही ट्विटरवर शेअर केले आहेत.

Leave a Comment