चांद्रयान 2 ने पाठवला चंद्राचा पहिला फोटो


चंद्राचा टीपलेला पहिला फोटो चांद्रयान 2 ने पाठवला असून तो भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोने आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे. चंद्रापासून तब्बल 2650 किमी इतक्या अंतरावरुन हा फोटो काढला आहे. पृथ्वीवरुन पाहताना टोपलीतील भाकरी एवढा दिसणारा हा चंद्र किती आकर्षक, सुंदर आणि तितकाच गूढ आहे, याची प्रचिती हा फोटो पाहिल्यावर येते.


चांद्रयान 2 ने अत्यंत अवघड असा मानला जाणारा टप्पा 21 ऑगस्ट रोजी पार केला. चांद्रयान 2 ने हा टप्पा पार करताच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया चांद्रयान 2 ने बुधवार, 21 ऑगस्ट 2019 सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी पूर्ण केली. चांद्रयान 2 14 ऑगस्ट 2019 रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. हे यान झेपावण्यापूर्वी चांद्रयान 2 मोहिमेत अनेक अडथळे आले. मात्र, हे सर्व अडथळे दूर करत चांद्रयान 2 चंद्राकडे झेपावले.

Leave a Comment