आपल्या केसांना ‘हटके’ कलर करताना…


केसांना कलर करायचे म्हटले, की अकाली किंवा प्रौढ वयामध्ये पांढरे झालेले केस लपविणे असा उद्देश एके काळी रूढ होता. पण आता काळ बदलला तशी केसांना कलर करण्याची संकल्पनाही बदलली. आताच्या काळामध्ये केवळ प्रौढ मंडळीच नाही, तर आजची तरुणाई देखील आपले केस मोठ्या हौशीने कलर करून घेत असते. इतकेच काय तर याच्याही दोन पावले पुढे जाऊन काही मंडळी आपल्या केसांवर गुलाबी, जांभळा, हिरवा आणि तत्सम ‘हटके’ रंगही लावण्याचा प्रयोग करून पहाताना दिसतात. अश्या प्रकारचे हेअर कलर्स सध्या तरुणाईमधे खूपच लोकप्रिय होत आहेत. मात्र असे हटके रंग आपल्या केसांना लावण्यापूर्वी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती करून घेणे आणि आपल्या केसांची निगा कशी राखायची याची माहिती आवश्यक आहे.

ज्यांच्या केसांचा रंग गडद काळा, किंवा ब्राऊन आहे, त्यांच्या केसांवर हे आगळे रंग उठून दिसण्यासाठी केसांना ब्लीच करण्याची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे जांभळा, निळा, गुलाबी इत्यादी रंग केसांना लावण्यापूर्वी हे रंग केसांवर उठून दिसावेत यासाठी केसांना मूळचा रंग हलका करण्याची आवश्यकता असते. याच कामी ब्लीचचा वापर करण्यात येतो. जर केसांचा रंग खूपच गडद असेल, तर तो रंग हलका व्हावा यासाठी एकदाच नाही, तर अनेकवेळा केसांवर ब्लीचचा वापर करण्यात येतो. केस रंगविताना हलक्या रंगाचे पोशाख परिधान करणे टाळावे. केस कलर केले जात असताना या कलरचे काही शिंतोडे कपड्यांवर उडण्याची शक्यता असते. हा कलर ‘पर्मनंट’ असल्याने याचे डाग पडून आपले कपडे कायमस्वरूपी खराब होण्याची शक्यता असते.

केस कलर केल्यानंतर जेव्हाही केस धुवायचे, तेव्हा त्यासाठी थंड पाण्याचाच वापर करावा. गरम पाण्याने कलर केलेले केस धुतल्याने कलर लवकर ‘फेड’ होतोच, त्याशिवाय केसांतील आर्द्रता केमी होऊन केस रुक्ष, कोरडेही दिसू लागतात. थंड पाण्याने केस धुतल्याने केसांवर कलर अधिक काळापर्यंत टिकून राहण्यास मदत होते. केसांना लावलेले काही रंग अनेक दिवस टिकत असले, तरी गुलाबी, जांभळा, हिरवा आणि निळा हे रंग काही दिवसांतच हलके होऊ लागतात. त्यामुळे हे रंग वारंवार ‘टच-अप’ करण्याची आवश्यकता पडू शकते.

Leave a Comment