आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल’ला ‘ढगाला लागली कळं’ची भूरळ


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट येणार असून तो ‘ड्रीम गर्ल’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठीमधील दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर दादा कोंडके यांचे लोकप्रिय गाणे ‘ढगाला लागली कळं, पानी थेंब थेंब गळं’ याचा रिमेक आयुष्मानच्या या चित्रपटात करण्यात येणार आहे.

दादा कोंडके यांच्या ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या चित्रपटातील हे गाणे असून दादा कोंडकेंसोबत या चित्रपटात अभिनेत्री उषा चव्हाण मुख्य भूमिकेत होत्या. ‘ढगाला लागली कळं हे अतिशय लोकप्रिय गाणे आहे. या गाण्याचा रिमेक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमिवर करावा ही कल्पना एकता कपूरची होती. ती कल्पना आम्हा सर्वांना आवडली आणि हे गाणे ड्रीम गर्ल चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल असा आम्हाला विश्वास आहे. हे गाणे आम्ही गणेशोत्सवा दरम्यान रिलीज करणार असल्याचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी म्हटले आहे.

१३ डिसेंबरला आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटानंतर आयुष्मान ‘बाला’, ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Leave a Comment