बॉलीवूडचे ‘शो मॅन’ घेऊन येत आहेत नवा कोरा मराठी चित्रपट


मराठी सिनेसृष्टीसाठी बॉलीवूडचे ‘शो मॅन’ अर्थात सुभाष घई हे नाव तसे काही नवीन नाही. सुभाष घई यांनी यापूर्वी मराठीतील ‘सनई चौघडे’, ‘वळू’ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘संहिता’, या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता आपल्या मुक्ता आर्ट्स या बॅनरतर्फे सुभाष घई हे विजेता या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

त्याचे पहिले पोस्टर नुकतेच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात लाँच करण्यात आले होते. तर या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत स्वतः सुभाष घई यांच्याच हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. अमोल शेडगे हे खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २४ जानेवारीला रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

अभिनेता सुबोध भावे हा या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर, मुख्य भूमिकेत अभिनेत्री पूजा सावंत देखील दिसणार आहे. अभिनेता सुशांत शेलार हा खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळेल. या तिघांशिवाय माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौघुले, तन्वी किशोर, क्रृतिका तुळसकर, प्रीतम कांगणे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपूरकर, ललित सावंत हे या चित्रपटात काम करताना दिसतील.

स्वतः अमोल शेडगे यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. निर्माते राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै असतील. तर आघाडीचे संगीतकार रोहन हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत.

Leave a Comment