अशोकमामा आणि निर्मिती सावंत महाराष्ट्राचे स्वच्छ सर्वेक्षणाचे सदिच्छा दुत


मुंबई – आता महाराष्ट्रातील जनतेला शौचालयाचे महत्व आपल्या कसदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पटवून देणार आहेत. जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नावाची महाराष्ट्र राज्य स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अ‌ॅम्बेसिडर म्हणून घोषणा स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. अभिनेत्री निर्मिती सावंत देखील यावेळी उपस्थित होत्या .

2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छ भारताचे लक्ष निर्धारीत करण्यात आले असून स्वच्छ सर्वेक्षण – 2018 आणि शाश्वत स्वच्छता आराखडा यासाठी तयार करण्यात आला होता. पण स्वच्छेतेच्या संदर्भातील अनेक समस्या या अहवालात समोर आल्यानंतर समाज प्रबोधन शाश्वत स्वच्छतेसाठी एक प्रभावी माध्यम असू शकते अशी चर्चा वारंवार केली जात होती. दरम्यान, ही जवाबदारी आता अशोक सराफ आणि निर्मिती सावंत या सिने कलाकारांवर देण्यात आली.

राज्य सरकारने मागील 5 वर्षांत राज्यभरात ७० लाख शौचालये बांधली आहेत. पण शौचालयांचा वापर अनेक ठिकाणी केला जात नसल्यामुळे स्वच्छ भारत मोहिमेला तडा जात असून स्वच्छतेबाबत जनसामान्यांत जागृती व्हावी. या दृष्टीने काम करत असल्याचे अभिनेते सराफ यांनी यावेळी सांगितले. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांनी अभिनय केलेल्या लोककलेच्या ध्वनी चित्रफिती स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तयार करण्यात आल्या असून या ध्वनी चित्रफिती सात हजार गावात दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक प्रयत्न केले गेले. अनेक मोहीम सकाळी उघड्यावर शौचालयास बसणाऱ्यांच्या विरोधात राबवल्या गेल्या. गुड मॉर्निंग पथक, वासुदेव आणि पोलिसांची कारवाई देखील करण्यात आली. मात्र काही लोकांची मानसिकता बदलली नसल्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे माहिती स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

Leave a Comment