अखेर व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे झाले नामकरण


गेल्या अनेक दिवसांपासून जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामचे नामकरण होणार अशी चर्चा सुरू होती. आता या दोन्ही अॅपचे नामकरण होण्यास अखेर सुरूवात झाली आहे. ‘व्हॉट्स अॅप फ्रॉम फेसबुक’हे नवे नाव दिसण्यास व्हॉट्स अॅपच्या लेटेस्ट बिटा व्हर्जनवर सुरूवात झाल्याचे वृत्त आहे.

नवे नाव अपडेट होण्यास व्हॉट्स अॅपच्या 2.19.228. या लेटेस्ट बिटा व्हर्जनवर सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ हे नाव इंस्टाग्रामच्याही 106.0.0.24.118. या लेटेस्ट व्हर्जनमध्ये दिसत आहे. सामान्य युजर्सपर्यंतही हे नवे अपडेट एका आठवड्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही लोकप्रिय अॅप्लिकेशन्सचे रिब्रॅण्डींग करणार असल्याचे फेसबुकने यापूर्वीच जाहीर केले होते.

फेसबुकच्या मालकीचे हे दोन्ही अॅप आहेत. इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप्लिकेशन २०१२ साली मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या फेसबुकने विकत घेतले. तर व्हॉट्सअॅपची मालकीही फेसबुककडे २०१४ साली गेली. या दोन्ही कंपन्या तेव्हापासून फेसबुकच्या मालकीच्या असल्या तरी संयुक्तपणे काम करत आहेत. पण या दोन्ही अॅपच्या नावामध्ये कुठेही फेसबुकचा उल्लेख आतापर्यंत नसल्यामुळे या दोन्ही अॅपची मालकी फेसबुककडे असल्याची माहितीच अनेकांना नव्हती. परिणामी कंपनीकडून फेसबुकच्या नावाचा या दोन्ही अॅपसाठी वापर कऱण्याचा निर्णय घेण्यात आला.

इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपचे स्वत:चे वेगळे व्यवस्थापक, कामगार आणि ऑफिस आहेत. ही दोन्ही लोकप्रिय अॅप्लिकेशन्स आपल्या मालकीची आहेत हे दाखवण्यासाठी फेसबुकने त्यांची नावे बदलली आहेत. हे प्रोडक्ट आणि सेवा फेसबुकच्या मालकीचे आहेत हे दाखवण्यासाठी हे बदल करण्यात येत आहे. भविष्यात फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी संग्लन करण्याचा कंपनीचा विचार असल्याचीही चर्चा आहे. या दोन्ही अॅपच्या संकेतस्थळावरील लॉगइन पेसेजवरील नावांच्या नंतरही ‘फ्रॉम फेसबुक’ या शब्दांचा समावेश केला जाणार आहे.

Leave a Comment