‘ड्रीमगर्ल’चे नवे गाणे तुमच्या भेटीला


‘आर्टिकल १५’ सारखा गंभीर विषय हाताळल्यानंतर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात आपले भक्कम स्थान निर्माण करणारा अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो आगामी ‘ड्रीमगर्ल’ चित्रपटातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी येत आहे. यापूर्वीच चाहत्यांची मने या चित्रपटाच्या ट्रेलरने जिंकली आहेत. तसेच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ‘राधे राधे’ गाण्यालाही मिळाला. आता या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

‘ड्रीमगर्ल’ चित्रपटात अनोखी भूमिका आयुष्मान खुराना साकारत आहे. त्याचे या चित्रपटातील काही डायलॉग्ज हे मुलीच्या आवाजातील आहेत. विशेष म्हणजे हा मुलीचा आवाजही त्याचाच असल्यामुळे तो चित्रपटात ‘पूजा’ नावाच्या मुलीच्या रुपात सर्वांना वेड लावताना दिसणार आहे.

आयुष्मान चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्यात पूजाच्या आवाजात सर्वांशी बोलताना पाहायला मिळतो. या गाण्याचे बोल ‘तेरे लिये दिल का टेलिफोन है बजता रिंग रिंग’ असे आहेत. त्याचे मुलीच्या रुपातील हावभावदेखील चाहत्यांना वेड लावत आहेत. हे गाणे जरी नुकतेच रिलीज झाले असले तरीही या गाण्याला आत्तापर्यंत ५० हजारपेक्षा जास्त व्ह्युव्हज मिळाले आहेत.

मित ब्रोस आणि जोनीता गांधी यांचा या गाण्याला आवाज मिळाला आहे. राज शांडल्य यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. आयुष्मान सोबत या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment