हिरोची ही इलेक्ट्रीक बाईक धावणार एका चार्जमध्ये 110 किमी


नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठे हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा ईआर आणि एनवायएक्स ईआर या दोन नव्या ई-स्कूटर लाँच केल्या आहेत. या ई-स्कूटरच्या किमती अनुक्रमे 68 हजार 721 रुपये आणि 69 हजार 754 रुपये अशा आहेत. ईशान्य दिल्ली वगळता देशभरात सर्व ठिकाणी या किमती लागू आहेत. याच गाड्यांची ईशान्य दिल्लीत किंमत अनुक्रमे 71 हजार 543 आणि 72 हजार 566 रुपये एवढी आहे. आहे.

भारतीय बाजारपेठेत हिरो इलेक्ट्रिकच्या आधीपासून ऑप्टिमा आणि एनवायएक्स या नावाच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. नव्या मॉडेलमध्ये ER चा अर्थ एक्सटेंडेड रेंज (Extended Range) असा आहे. म्हणजेच हे नवे मॉडेल आता आधीपेक्षा जास्त अंतर धावेल. ड्यूल लिथियम-आयन बॅटरी या मॉडेलमध्ये देण्यात आली आहे.

4 ते 5 तासातच हिरो इलेक्ट्रिकच्या नव्या दोन्ही ई-स्कूटर्सची बॅटरी पूर्ण चार्ज होते. ऑप्टिमा ईआर बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 110 किलोमीटर आणि एनवायएक्स ईआर 100 किलोमीटरपर्यंत चालते, असा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही स्कूटर्सचा धावण्याचा सर्वाधिक वेग ताशी 42 किलोमीटर प्रतितास आहे. योग्यरित्या देखभाल-दुरुस्ती केल्यास स्कूटरची बॅटरी 5 वर्षांपर्यंत चालेल, असेही कंपनीने म्हटले आहे.

खास ऑफिसला जाणारे मध्यमवर्गी आणि कॉलेजचे विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेऊन ऑप्टिमा ईआर स्कूटर तयार करण्यात आली आहे. एनवायएक्स ईआरची निर्मिती छोटे व्यावसायिक, व्यापारी, ई-कॉमर्स डिलिव्हरी कर्मचारी आणि रेंटल ई-बाइक्स यानुसार होणार आहे. दोन्ही स्कूटर्समध्ये अलॉय विल्स, एलईडी हेडलाईट्स, डिजिटल स्पीडोमीटर, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रिजनरेटिव ब्रेकिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

सरकारकडून देखील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन दिले जात असल्यामुळेच देशभरात इलेक्ट्रिक कारपासून इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकपर्यंत मागणी वाढली आहे. पुढील वर्षापर्यंत तर देशातील इलेक्ट्रिक गाड्यांची सफर एका नव्या टप्प्यावर पोहचलेली असेल. 2020 पर्यंत आर्टिफिशल इंटेलिजन्सने सज्ज इलेक्ट्रिक सुपरबाईक देखील बाजारात येतील. बजाज, टीव्हीएस आणि हिरोसारख्या प्रमुख कंपन्यांसह अनेक नव्या कंपन्या या बाईकच्या निर्मितीत आघाडीवर असतील.

Leave a Comment