अमित शहा यांच्या भेटीला नाना पाटेकर


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अभिनेते नाना पाटेकर यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. नानांनी गडकरींची भेट घेतल्यानंतर अमित शहांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. पण व्यक्तीगत कामासाठी ही भेट घेतल्याचा दावा नानांनी केला आहे. पण ही भेट नाम फाऊंडेशनसाठी परदेशी देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळावी यासाठी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनेक विकासकामे नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असून जनतेकडून आलेल्या देणग्यांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. देणगी देण्यासाठी परदेशातूनही अनेक जण इच्छुक आहेत. पण परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांवर नवीन कायद्यानुसार नियंत्रण आले आहे.

नाना पाटेकर यांनी मागच्याच आठवड्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरला भेट दिली होती. नाना पाटेकर यांनी यावेळी पूरग्रस्तांसाठी दीड हजार घरे बांधण्याचा संकल्प केला होता. मागच्या एक ते दीड वर्षापासून नाम फाऊंडेशनला परदेशातून देणग्या मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण ही परवानगी मिळत नसल्यामुळे नाम फाऊंडेशकडून प्रयत्न केले जात आहेत.

कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना तातडीने घरे बांधून द्यायची आहेत, त्यासाठी निधी लागणार आहे. नाम फाऊंडेशनला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमधून नागरिक मदत देण्यासाठी इच्छुक आहेत, पण या मदतीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. ही परवानगी नसल्यामुळे परदेशातून देणग्या मिळवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी नाना पाटेकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली.

Leave a Comment