पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेपावले चांद्रयान-2


नवी दिल्ली – मंगळवारी मध्यरात्री आणखी एक महत्त्वाचा चांद्रयान 2 ने टप्पा गाठला असून चांद्रयान मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेपावल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. ट्रान्स लूनर इंजेक्शनला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) यशस्वीरित्या पूर्ण केले. यादरम्यान 1,203 सेकंदासाठी स्पेसक्राफ्टचे लिक्विड इंजिन फायर करण्यात आले. यानंतर पृथ्वीच्या कक्षेत 22 दिवस असलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले.

चांद्रयान पुढील सहा दिवस आपला चंद्राच्या दिशेने प्रवेश सुरू ठेवणार असून ते 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. यानंतर चांद्रयान-2 हे 20 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी दिली. चांद्रयान-2 चे प्रोपल्शन सिस्टम चंद्राच्या नजीक पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा फायर करण्यात येणार असल्यामुळे या यानाची गती कमी होईल. हे यान त्यामुळे चंद्राच्या प्राथमिक कक्षेत स्थिरावणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर चांद्रयान दोन फेऱ्या मारेल. प्रोपल्शन सिस्टमच्या मदतीने चांद्रयान 2 ची कक्षा कमी केली जाणार असल्याची माहिती, सिवन यांनी दिली.

चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून आज चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला. चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत 20 ऑगस्टला प्रवेश करणार आहे. विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून तीन सप्टेंबरला वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान 2 चा प्रयत्न असेल.

Leave a Comment