गायक मिका सिंहवर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ची बंदी


पाकिस्तानातील एका कार्यक्रमात गायक मिका सिंह याने परफॉर्म केल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने घेतला आहे. देशप्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व मिकाने दिल्यामुळे हा बहिष्कार त्याच्यावर टाकण्यात आल्याचे असोसिएशनने जाहीर केले आहे.

8 ऑगस्टला पाकिस्तानातील एका हाय प्रोफाईल व्यक्तीच्या कार्यक्रमात बॉलिवूडमधील आघाडीचा गायक मिका सिंह याने परफॉर्म केल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने घेतला आहे. देशप्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व मिकाने दिल्याने हा बहिष्कार त्याच्यावर टाकण्यात आल्याचे असोसिएशनने जाहीर केलेल्या पत्रकातून सांगण्यात आले आहे.

उरी, पठाणकोट आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध चांगलेच चिघळले आहेत. मिकाने अशात हे सगळे विसरून पाकिस्तानात जाऊन पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयाच्या पार्टीत जाऊन गाणे म्हणजे या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करण्यासारखेच असल्याचे या पत्रकात म्हणण्यात आले आहे.

त्यामुळे मिकासोबत सिनेसृष्टीतील सर्व प्रमुख निर्माते, स्टुडिओ, म्युझिक कंपन्या, प्रोडक्शन्स हाऊस यांनी यापुढे काम करू नये असे त्यांना या पत्रकातून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत सुरू असलेली सर्व कॉन्ट्रॅक्ट रद्द करून त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पत्रक ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी त्यांच्या सहीनिशी जाहीर केले असून ते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही पाठवले आहे. या बहिष्काराबाबत मिकाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तर दुसरीकडे असोसिएशनच्या या बहिष्काराला इंडस्ट्रीकडून कसा प्रतिसाद मिळतो हे ही लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment