‘सेक्रेड गेम्स २’मध्ये खलनायक साकारणार अमेय वाघ


अवघ्या एक दिवसात वेब विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागामध्ये असलेल्या कथानक, तगडे कलाकार, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर या सीरिजने राज्य केले. आता ‘सेक्रेड गेम्स २’बाबतची रसिकप्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुढच्या भागातही पहिल्या भागामधील सैफ अली खान (सरताज सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतिन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा गुरु) हे दिसणार आहेत. पण नवीन कलाकारांचा यामध्ये समावेशही झाला आहे. अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी या दोन नवीन कलाकारांसह मराठमोळा अभिनेता अमेय वाघ देखील दुसऱ्या पर्वामध्ये दिसणार आहे.

अमेयने ‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सिझन प्रदर्शित होताच सर्व एपिसोड्स एका दिवसात पाहिले होते. या वेब सीरिजमध्ये काम करण्याचे तेव्हापासून अमेयचे स्वप्न होते. सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन मी सलग पाहिला असल्यामुळे या वेब सीरिजच्या प्रेमात मी होतो. सेक्रेड गेम्समधील एका भूमिकेसाठी सहा सात महिन्यांनंतर मला ऑडिशन देण्यास बोलवण्यात आले पण माझी तेव्हा दुर्दैवाने निवड झाली नाही. त्यानंतर मी पुन्हा एकदा दुसऱ्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली. त्यावेळी मला माझे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटल्याचे अमेय म्हणाला.

मला ”सेक्रेड गेम्स २’मधील भूमिकेविषयी फारसे सांगता येणार नाही. पण आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. सेक्रेड गेम्स २ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत मी दिसणार असल्याचा खुलासा मात्र अमेयने केला आहे. एकंदरीत अमेयच्या अभिनयाची एक वेगळी छटा सेक्रेड गेम्यमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांसाठी हा सुखद धक्का असेल यात काही शंका नाही.

Leave a Comment