जीव वाचवण्यासाठी अतिरेक्यालाही आधार भारताचाच!


नुकत्याच दिवंगत झालेल्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या कार्यकाळात अनेक पाकिस्तान्यांना उपचारासाठी भारतात येण्यासाठी मदत केली होती. दयाभाव दाखवून त्यांनी अनेकांना चाकोरीबाहेर जाऊन मदत केली होती. जो पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध कारवाया करतो आणि भारताविरुद्ध गरळ ओकतो, तेथील गरजवंता रुग्ण उपचारांवाचून राहू नयेत, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर कट्टरवाद आणि अतिरेकी विचारांचा प्रसार करणाऱ्यांनाही जीवावर बेतले की भारत आठवतो.

याचे ताजे उदाहरण म्हणजे नायजेरियातील कट्टरवादी नेता शेख जकजकी याचे. देशातील इस्लामी आंदोलनाचा (इस्लामिक मूव्हमेंट इन नायजेरिया – आयएमएन) नेता असलेला शेख जकजकी उपचारासाठी दिल्लीत दाखल झाला आहे. गेल्या आठवड्यात नायजेरियाच्या कादूना प्रांतातील उच्च न्यायालयाने शेख जकजकी व त्याच्या पत्नीला उपचारांसाठी भारतात जाण्याची परवानगी दिली होती. शेख जकजकी व त्याची पत्नी मलामा झीनाह अबूजा येथून सोमवारी भारतासाठी निघाले होते. विमानात बसलेल्या जकजकीची छायाचित्रे त्याच्या आयएमएन संघटनेने प्रसिद्ध केली आहेत.

शेख याकूब इब्राहीम एल-जकजकी हा नायजेरियातील अतिरेकी इस्लामी विचारांचा पाईक मानला जातो. शिया पंथाचा तो सर्वात प्रभावशाली नेता मानला जातो. नायजेरियाच्या सैन्याने 13 डिसेंबर 2015 रोजी कादूना प्रांतातील जारिया शहरात असलेल्या एका इमाम बारगाहावर हल्ला केला होता. तेव्हा जकजकी व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून हे दोघेही अटकेत आहेत. जकजकीच्या अनुयायांनी नायजेरियाचे सैन्यप्रमुख लेफ्टनंट जनरल तुकुर बुराताई यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्याला उत्तर म्हणून सैन्याने हा हल्ला केला होता आणि त्यावेळी सैन्य व जकजकीच्या अनुयायांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला होता. त्यावेळी शेकडो अन्य इस्लामी अतिरेकी मारले गेले होते आणि जखमीही झाले होते. मारले गेलेल्यांमध्ये शेख जकजकीचे तीन मुले सामील होते.

जगातील7 देशांच्या 186 डॉक्टरांना नायजेरियाच्या सरकारला पत्र लिहून त्याला उपचारासाठी भारतात पाठवण्याचा सल्ला दिला होता. जकजकी याची शारिरिक स्थिती अत्यंत गंभीर असून त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. दुसऱ्या डोळ्याची दृष्टी जाण्याच्या बेतात आहे. त्याच्या रक्तात विष झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकते, असे या डॉक्टरांनी सांगितले होते.

हा मूळचा उत्तर नायजेरियातील जरिया शहराचा रहिवासी. इराणमध्ये 1979 साली इस्लामी क्रांती झाली तेव्हा नायजेरियातही असेच धार्मिक सरकार स्थापन करता येईल, असे त्याला वाटत होते. त्यावेळी नायजेरियातील विद्यापीठांमध्ये इस्लामिक कायदा लागू करावा, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्या विद्यार्थ्यांमध्ये जकजकी हाही होता. तेव्हापासून तो कट्टर इस्लामी विचारांचा प्रसार करत आहेत. नायजेरियात 1980 आणि 1990 च्या दशकात लष्करी राजवट असताना नागरी अवज्ञा केल्याच्या आरोपावरून त्याला अनेकदा अटक करण्यात आली होती. आजही नायजेरियाचे सरकार त्याच्याकडे संशयाने पाहते. आपण स्वतः अनेक तरुणांना युद्धाचे प्रशिक्षण दिल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे.

जकजकी नेहमी आपल्या अंगरक्षकांच्या गराड्यात वावरतो. त्याच्या कार्यालयात इराणचे नेते अयातोल्ला खोमेनी यांचे मोठे छायाचित्र टांगलेले असते. जकजकीला इराणकडून आर्थिक मदत मिळत असल्याचे सांगितले जाते, मात्र ते स्वतः त्याचा इन्कार करतात. परंतु ते आणि त्यांचे पूर्णपणे अमेरिकेच्या विरोधात आहेत, हा इराण आणि त्यांना जोडणारा दुवा आहे.

जकजकी आपल्या समर्थकांचे संचलन काढतात आणि या संचलनात हजारो समर्थक भाग घेतात. त्यामुळे अनेकदा त्यांची अन्य गटांशी टक्करही होते. खासकरून बोका हराम या दुसऱ्या कुख्यात दहशतवादी संघटनेशी त्यांचे वैर असल्याचे मानले जाते. बोको हराम ही सुन्नी मुस्लिमांची संघटना असून जकजकी हे शिया नेते आहेत. गंमत म्हणजे जकजकी हा मूळचा सुन्नी मुस्लिम, मात्र इराणमध्ये शिकायला गेला असताना त्याने शिया पंथ स्वीकारला. मात्र हे गुपित त्याने बरीच वर्षे लपवून ठेवले होते. अखेर 1994 साली त्याने आपण शिया मुस्लिम असल्याचे जाहीर केले तेव्हा त्याच्या संघटनेत फूट पडली होती. खुद्द त्याचा मोठा भाऊ शेख मुहम्मद सानी याकूब यानेही जकजकी हा दहशतवादी असल्याचे दि नेशन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याला उपचारांसाठी भारतात नेण्याच्या मुद्दयावरून नायजेरिया सरकारने त्याच्यावर अनेक अटी घातल्या आहेत.

असा हा अतिरेकी, किंवा कथित दहशतवादी, आपल्या प्राणाची भीक मागत भारताच्या दारात आला आहे. जीव वाचवण्यासाठी अखेर अतिरेक्यालाही भारताचाच आधार लागतो.

Disclaimer: या लेखात मांडली गेलेली मते आणि दृष्टीकोन लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी माझा पेपर व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. तसेच वरील लेखाची कोणत्याही प्रकारची जवाबदारी माझा पेपर घेत नाही