आता इतक्या वाजता सुरु होणार सर्व सार्वजनिक बँका


नवी दिल्ली – सामान्यपणे सकाळी १० वाजता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील काम सुरू होते. पण, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि ग्रामीण बँका अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार सकाळी ९ वाजता उघडतील. एकाच वेळी देशभरातील सर्व बँका सुरू व्हाव्यात या उद्देशाने केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने हा निर्णय घेतला आहे. या विभागाने त्यासाठी जूनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. सर्व शाखा ग्राहकांच्या सोयीनुसार सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला होता. या बदलाला त्यानुसार मंजुरी मिळाली आहे.

ग्राहकांच्या सुविधांवर स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या २४ जून रोजीच्या बैठकीत बँकांच्या शाखा उघडण्यावर तीन पर्याय आयबीएने दिले होते. पहिला, सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत. दुसरा, सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आणि तिसरा, सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हा पातळीवरील ग्राहक समन्वय समितीच्या बैठकीत आयबीएने बँकांना यावर निर्णय घेण्यास तसेच त्यांची सूचना स्थानिक वृत्तपत्रांत देण्यास सांगितले होते. वास्तविक ज्या ठिकाणी ग्राहकांना उशिरापर्यंत बँकिंग सेवा हवी आहे, त्या ठिकाणी आधीप्रमाणेच सकाळी १० किंवा ११ वाजता बँका सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध राहील.

सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच विभागीय ग्रामीण बँकांना (आरआरबी) हा निर्णय लागू असेल. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, बँकेची शाखा उघडण्यासंदर्भात हा निर्णय सप्टेंबरपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment