अभिनेत्री श्रीदेवी यांच्याविषयी काही रोचक तथ्ये


उत्कृष्ट अभिनय, नृत्यकलानिपुण आणि अप्रतिम सौंदर्य यांच्या जोरावर ‘बॉलीवूडमधील पहिली महिला सुपरस्टार’ असा लौकिक अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये संपादन केला होता. एके काळी बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचे २०१८ साली अकस्मात निधन झाले. तर ऑगस्ट रोजी श्रीदेवी यांचा जन्मदिन असून, या निमित्ताने त्यांच्याविषयी थोडे अधिक जाणून घेऊ या. श्रीदेवी यांचा जन्म १९६३ साली झाला असून, अय्यप्पन आणि राजेश्वरी अयंगर त्यांचे माता-पिता होते. श्रीदेवी यांचे मूळचे नाव श्री अम्मा अयंगर अय्यप्पन असे होते. वयाच्या चौथ्या वर्षी, १९६९ साली ‘थुनैवन’ नामक भक्तीपर चित्रपटापासून श्रीदेवी यांच्या अभिनयक्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात झाली. तसेच १९७५ साली श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून ‘ज्युली’ या चित्रपटात भूमिका केली. १९७९ साली ‘सोलवा सावन’ या चित्रपटाद्वारे श्रीदेवी यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

१९७६ साली ‘मून्द्रू मुडीचू’ या तमिळ चित्रपटामध्ये श्रीदेवी यांनी अभिनेते रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. श्रीदेवी यांचे ‘चालबाज’ चित्रपटातील गीत ‘ना जाने कहां से आई है’ जेव्हा चित्रित केले गेले, तेव्हा श्रीदेवी यांना अतिशय ताप आलेला होता. तश्याही अवस्थेत पाण्यामध्ये भिजत श्रीदेवी यांनी हे गीत चित्रित केले. हेच गीत या चित्रपटातील सर्वात लोकप्रिय गीत ठरले. श्रीदेवी यांनी चित्रपटांमध्ये भूमिका करताना अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. यामध्ये ‘सदमा’, ‘चांदनी’, ‘गर्जना’, ‘क्षण क्षणम’ या चित्रपटांचा समावेश आहे.

१९९२ साली सुपरहिट ठरलेल्या ‘बेटा’ या चित्रपटातील माधुरी दीक्षितने साकारलेली भूमिका आधी श्रीदेवी यांना देऊ करण्यात आली होती. किंबहुना ही भूमिका श्रीदेवी यांनीच करावी असा चित्रपट निर्माते इंदर कुमार यांचा आग्रह होता. मात्र अनिल कपूर यांच्यासोबत अनेकदा चित्रपट केले असल्याने श्रीदेवी यांनी ही भूमिका करण्यास नकार दिल्याने ही भूमिका माधुरी दिक्षीतला देऊ केली गेली. श्रीदेवी यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी नाही, तर हॉलीवूड चित्रपट करण्यासही नकार दिला होता. १९९३ साली हॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ‘ज्युरासिक पार्क’ या चित्रपटामध्ये श्रीदेवी यांना भूमिका देऊ करण्यात आली होती. मात्र ही भूमिका लहानशी असल्याने श्रीदेवी यांनी ही भूमिका साकारण्यास नकार दिला होता.

श्रीदेवी यांची मातृभाषा तमिळ असल्याने त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी हिंदी भाषेमध्ये ‘डबिंग’ करण्यात येत असे. अभिनेत्री नाझ श्रीदेवीच्या भूमिकेसाठी डबिंग करीत असत. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आखरी रास्ता’ या चित्रपटासाठी रेखा यांनी श्रीदेवीसाठी डबिंग केले होते. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी’ या चित्रपटापासून श्रीदेवी यांनी स्वतःच्या भूमिकांसाठी डबिंग करण्यास सुरुवात केली. श्रीदेवी आणि जयाप्रदा या दोन्ही अभिनेत्रींची एकमेकांशी सतत स्पर्धा असून, त्यांचे एकमेकींशी अजिबात पटत नसल्याच्या चर्चाही फिल्मी दुनियेत प्रसिद्ध होत्या. १९८४ साली अभिनेते राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यामध्ये संवाद सुरु करावा या इराद्याने त्यांना एका खोलीमध्ये बसवून खोलीला बाहेरून कडी घालून टाकली. काही वेळानंतर जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा या दोघींमध्ये बातचीत सुरु झाली असावी असे सर्वांना वाटले. मात्र झाले काही भलतेच. खोलीचा दरवाजा उघडला गेला तेव्हा दोघी अभिनेत्री मान फिरवून खोलीच्या दोन कोपऱ्यांत बसलेल्या पहावयास मिळाल्या.

श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारलेले दोन चित्रपट सुरुवातीला इतर अभिनेत्रींना देऊ करण्यात आले होते. ‘नगीना’ या चित्रपटातील मुख्य भूमिका जयाप्रदा यांना, तर ‘चांदनी’ या चित्रपटातील मुख्य भूमिका रेखा यांना देऊ करण्यात आली होती. मात्र जयाप्रदा आणि रेखा यांनी या भूमिका नाकारल्यानंतर या भूमिका श्रीदेवी यांना मिळाल्या होत्या. श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका असलेले हे दोन्ही चित्रपट अतिशय गाजले होते.

Leave a Comment