सध्या सोशल मीडियावर भरजरी लेहंग्यामध्ये आपल्या लहान मुलाला स्तनपान करतानाचा एका महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यावरुन नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे व्यावसायिक आणि इन्स्टाग्रामवर फॅशन इन्फ्लुएन्सर आणि तज्ज्ञ असणाऱ्या शायून मेंडेलूक हिचा. तिने नुकतेच एक फोटोशूट केले.
तिने हे फोटो पोस्ट करताना महागड्या लेहंग्यामध्ये बाळाला स्तनपान करतानाचे फोटो शूट करण्यामागे खास कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. शायूनने हे फोटोशूट आशियामधील लोकांना संदेश देण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. तिने हे फोटो जागतिक स्तनपान आठवड्यानिमित्त पोस्ट करत आशियामधील लोकांना त्यांच्या स्तनपानाविषयी असणाऱ्या न्यूनगंडामधून मुक्त होण्यास सांगितले आहे.
शायून व्हायरल झालेल्या या फोटोशूटमधील फोटोंमध्ये लेव्हेंडर रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. फुलांचे नक्षीकाम या लेहंग्यावर आहे. शायूनने या लेहंग्याला साजेरा ब्लाऊज परिधान केला होता. तिने यावर दक्षिण आशियाई देशांमध्ये पारंपारिक कपड्यांसोबत घालणारे दागिने म्हणजेच नथ, माथ्यावरचा टिळक म्हणून झुमर, दोन पारंपारिक पद्धतीचे कानातील डूल आणि हार घातल्याचे दिसत आहे.
आपले फोटो व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर या फोटोंमागील अर्थ समजून घेणाऱ्या फॉलोअर्सचे तिने आभार मानले आहेत. मला माझ्या शेवटच्या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहून खूपच आनंद झाला आहे. या फोटोंमागील अर्थ ज्यांना ज्यांना कळला आणि तो त्यांनी शेअर करत इतरांपर्यंत पोहोचवला त्या सर्वांचे धन्यवाद. तुम्हाला माझ्या शब्दांनी प्रेरणा मिळो हिच माझी इच्छा आहे. त्या फोटोंमधून मला कोणावरही टीका करायची नव्हती. फक्त एवढच मला सांगायचे होते की तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा, कसलीही लाज आणि खदखद मनात न ठेवता जगा, असे तिने या आभार प्रदर्शनाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.