दलाई लामांची लँडरोव्हर विकणे आहे


नवी दिल्ली – पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुनी तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांच्या मालकीची १९६६ची लँडरोव्हर IIA ही विंटेज कार आता विक्रीसाठी उपलब्ध झाली असून तुम्हीही ही कार विकत घेऊ शकता. २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात त्यासाठी लिलाव होणार आहे.

आर. एम. सोदबी या लिलाव कंपनीने पन्नास वर्षांपेक्षा जुनी असलेली दलाई लामांची ही कार विक्रीसाठी काढली आहे. जुलै महिन्यांत या कारच्या लिलावासाठी नोंदणी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर या कारचा २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात लिलाव होणार आहे. ही कार दहा वर्षे (१९६६-१९७६) शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या दलाई लामा यांनी स्वतः वापरली.

आर. एम. सोदबी कंपनीने आपल्या वेबसाईटवर या कारच्या लिलावासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, ही कार ८८ इंच व्हीलबेस चासीवर बांधण्यात आली असून तिची बांधणी १० फेब्रुवारी १९६६ मध्ये पूर्ण झाली. ती त्यानंतर १७ फेब्रुवारी १९६६ रोजी नेपाळला पाठवण्यात आली. नेपाळमधून दलाई लामा यांचे बंधू तेनझीन चेओग्याल यांनी त्यानंतर ती स्वतःच ड्राईव्ह करीत भारतात आणली. ती त्यानंतर दलाई लामा यांच्या सेवेत दाखल झाली. ही कार चेओग्याल यांनी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथील डोंगऱाळ रस्त्यांवर बहुतेक वेळा चालवली आहे.

अमेरिकेत तिबेटमधील जे निर्वासित दाखल झाले होते ही कार २००५ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील दलाई लामा फाऊंडेशनला त्यांच्यासाठी निधी उभारण्याकरीत दान करण्यात आली. लँड रोव्हरने २००६ मध्ये या कारची पुनर्बांधणी केली. यामध्ये नवे इंजिन, ओरिजिनल ब्रॉन्झ ग्रीन पेंट लावण्यात आला, सीट आणि टायर्सही बदलण्यात आले. त्यामुळे ही कार आता नव्या रुपात आणि सुस्थितीत आहे.

ब्रिटिश मोटर इंडस्ट्रीचे हेरिटेज ट्रस्ट प्रमाणपत्रही या कारला देण्यात आले आहे. तसेच मॅन्युअलच्या पहिल्या पानावर मूळ मालक चेओग्याल यांची सही आहे. तसेच दलाई लामा यांचे नाव मालक आणि दान केलेल्या कागदपत्रांवर आणि कारच्या इन्शुरन्स पॉलिसीवर आहे. त्याचबरोबर या कारला तिची ओरिजनल नंबर प्लेटही तशीच ठेवण्यात आली आहे. या कारचा क्रमांक HIM-7555 असा आहे. HIM हा पूर्वीचा हिमाचल प्रदेशचा वाहन नोंदणी कोड आहे.

लँडरोव्हर लाईफस्टाईल मॅगझिन २००७च्या कव्हर पेजवरही ही कार झळकली होती. ही विंटेज कार ग्राहकांसाठी एक खास कार असणार आहे. कंपनीच्या https://rmsothebys.com. या वेबसाईटवर या आयकॉनिक एसयुव्ही कारच्या लिलावासाठी नोंदणी करता येणार आहे. १ लाख ते १.५ लाख डॉलरच्या रेंजमध्ये या कारची सुरुवातीची लिलावाची रक्कम ही ठेवण्यात आली आहे. पण, ही कार दलाई लामांची असल्याने तिला या पेक्षा खूपच चांगली किंमत मिळेल अशी आर. एम. सोदबी कंपनीला आशा आहे.

Leave a Comment