राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार अजिंक्य रहाणे ?


नवी दिल्लीः राजस्थान रॉयल्सचा अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली संघाकडून रहाणेला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. रहाणेला आपल्या संघात घेण्यासाठी त्यांनी राजस्थान संघाशी बोलणी सुरू केली असल्यामुळे रहाणे 2020च्या आयपीलमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्सचे रहाणेला संघात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण हे डील होईल का, हे आताच सांगणे अवघड आहे. अनेक नियमांचे या करार होण्यापूर्वी काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. राजस्थान संघाचा रहाणे हा मोठा खेळाडू असल्यामुळे ते हा निर्णय घेण्यापूर्वी विचार नक्की करतील.

ही डील यशस्वी झाल्यास आयपीएलमधील हा मोठा फेरबदल ठरेल. दिल्लीने गतवर्षी शिखर धवनला सनरायझर्स हैदराबादकडून आपल्या चमूत दाखल करून घेतले होते. दिल्लीकडून खेळताना धवनने 2019च्या मोसमात 521 धावा केल्या होत्या आणि दिल्लीने 2012नंतर प्रथमच आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेशही केला होता.