सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा शुल्कात २४ टक्क्यांची वाढ


नवी दिल्ली – अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) १० वी आणि १२ वीच्या परीक्षा शुल्कात २४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता ५० रुपये ऐवजी १२०० रुपये फी जमा करावी लागेल. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील शुल्कामध्येही वाढ करण्यात आली असून आता ७५० ऐवजी १५०० रुपये परीक्षा फी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.

३०० रुपये जादा १२ वी बोर्डाच्या परीक्षेतील अतिरिक्त विषयासाठी एसी, एसटी विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापूर्वी अतिरिक्त विषयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येत नव्हते. अतिरिक्त विषयांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५० रुपयांऐवजी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. पूर्णत अंध विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क माफ करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, अंतिम तारखेच्या अगोदर नव्या दरानुसार जे विद्यार्थी शुल्क जमा करणार नाहीत, त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नसल्यामुळे २०१९-२० च्या परीक्षेसाठी त्यांना बसता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. स्थानांतरण शुल्क (माइग्रेशन शुल्क) १५० रुपयावरून वाढवून ३५० रुपये करण्यात आले आहे. परदेशातील सीबीएसईच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच विषयांची बोर्ड परीक्षा फी आता १० हजार रुपये भरावी लागणार आहे, जी पूर्वी ५ हजार रुपये होती, तर अतिरिक्त विषयासाठी १ हजार रुपयांऐवजी २ हजार रुपये भरावे लागतील.

Leave a Comment