प्राप्तिकर विभागाने जप्त केला मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुतण्याचा ३०० कोटींचा बंगला


नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या रतुल पुरीविरोधात मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागाकडून दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या पुरी यांच्या ३०० कोटींच्या बंगल्यावर जप्ती आणली आहे. रतुल पुरीवर ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात मनी लाँड्रींग केल्याचा आरोप आहे.

हा बंगला दिल्लीतील ल्युटन्स परिसरातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्गावर आहे. हा बंगला मोसर बेअर ग्रुपच्या नावावर नोंदणीकृत असून रतुल पुरी यांचे वडील दीपक पुरी या ग्रुपचे मालक आहेत. ही कारवाई बेनामी संपत्ती कायद्यातंर्गत करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरी यांच्या ४० दशलक्ष डॉलरच्या थेट परदेशी गुंतवणुकीवरही प्राप्तिकर विभागाकडून गदा आणली आहे. बेनामी संपत्ती विरोधी कायद्यानुसार ही कारवाई झाली असून रतुल पुरी आणि दीपक पुरी यांच्याशी संबंधित गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले. रतुल पुरीविरोधात प्राप्तिकर विभागाने केलेली ही दुसरी कारवाई आहे.

Leave a Comment