पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट पदार्थांच्या ऐवजी निवडा हे आरोग्यपूर्ण पर्याय


बाहेर कोसळणारा पाऊस, अंगावर शहारे आणणारा हवेतला गारवा, हातातल्या कपातला वाफाळता चहा हे दृश्य जोडीला चमचमीत भजी, वडापाव किंवा तत्सम काहीतरी चटकदार खाऊ असल्याशिवाय पूर्णच होत नाही. पण एकीकडे चमचमीत भज्यांवर मनापासून ताव मारत असताना दुसरीकडे मात्र आपण अतिशय तेलकट पदार्थ खात असल्याची बोचही मनामध्ये असतेच.

पावसाळ्यामध्ये पचनशक्ती तशीही मंदावलेली असते. अश्यात तळलेले पदार्थ सातत्याने खाल्ले गेल्यास अपचनाचा त्रास होतोच, शिवाय वजन वाढण्याची शक्यताही असतेच. अश्या वेळी आपल्याला खाव्याश्या वाटणाऱ्या तेलकट पदार्थांसाठी काही आरोग्यपूर्ण पर्याय स्वीकारणे योग्य ठरते. या पर्यायी पदार्थांमुळे तेलाचे प्रमाण नियंत्रित राहते, पोषण मिळते आणि हे पदार्थही तितकेच चविष्टही असतात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम आलू टिक्की किंवा रगडा पॅटीस खाण्याच्या ऐवजी डाळी किंवा भाज्यांचा वापर करून घरच्याघरी तयार केलेली कटलेट्स हा अतिशय चविष्ट पर्याय आहे. या कटलेटमध्ये बटाट्याच्या ऐवजी हिरवे मूग, कोबी, गाजर, ब्रोकोली, पालक यांसारख्या भाज्या, शिजविलेली कडधान्ये यांचा वापर करता येऊ शकेल.

हे सर्व पदार्थ आधीच शिजवून घेतले असल्याने हे कटलेट बनविण्यासाठी अतिशय कमी तेलाची आवश्यकता असते. त्यामुळे उत्तम स्वाद आणि पोषण असा दुहेरी फायदा या कटलेटमध्ये मिळतो. ब्रेड पकोडा या पदार्थाला देखील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पसंती दिली जाते. पण बेसनामध्ये बुडवून तेलामध्ये टाळून काढलेल्या ब्रेड पकोड्याच्या ऐवजी ग्रिल्ड सँडविचला पसंती देणे अधिक चांगले. यासाठी होल व्हीट ब्रेडचा वापर करणे अधिक चांगले. यामध्ये चीझ वापरायचे झाल्यास प्रोसेस न केलेले चीझ वापरणे अधिक चांगले.

चटपटीत टिक्की किंवा भेळेच्या ऐवजी ताजे भाजेलेले कणीस अधिक उत्तम. याद्वारे शरीराला मुबलक प्रमाणात फायबर मिळते. मक्यामध्ये असलेले लुटेईन आणि झियाक्झँथिन दृष्टीदोष दूर करण्यासाठी सहायक असतात.

पावसाळ्याच्या दिवसांत सतत साखरयुक्त चहा-कॉफीच्या सेवनाच्या ऐवजी ग्रीन टी, ‘इंफ्युज्ड टी’ यांचे सेवन अधिक असावे. यामुळे पचनक्रिया चांगली रहात असून, शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासही मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment