असा आहे मांजरेकरांचा साहोमधील खलनायकी अंदाज


30 ऑगस्ट रोजी रसिकांच्या भेटीला प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘साहो’ हा चित्रपट येणार असून या चित्रपटाचा ट्रेलर आज (10 ऑगस्ट) रिलीज करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटामध्ये खास भूमिकेत झळकणार्‍या महेश मांजरेकरांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. ‘साहो’ चित्रपटातील आपला लूक महेश मांजरेकरांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.

या पोस्टरवर Demons Do Have Shadow असे लिहण्यात आल्यामुळे ‘साहो’ चित्रपटात महेश मांजरेकर खलनायकी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सध्या बिग बॉस मराठी 2 या शोचे महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत. ‘विकेंडचा डाव’ मध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळा घेणार्‍या मांजरेकरांना आता या नव्या रूपात बॉलिवूडमध्ये पहाणे त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेची गोष्ट आहे.


या चित्रपटात प्रभास-श्रद्धा ही नवीकोरी जोडी, त्यांची केमिस्ट्री, रोमान्स आणि अॅक्शन पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या शिवाय ‘साहो’ चित्रपटात नील नितीन मुकेश, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि मंदिरा बेदी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Comment