मुंबईच्या महापौरांना शिष्टाचाराचे धडे देणार मनसे


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांचा निषेध करणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याचे प्रकरण लावून धरले असून महिलेचा हात पिरगळल्याप्रकरणी महापौरांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्यानंतर मनसेने आता महापौरांना महिलांसोबत कसे वागले पाहिजे याचे धडे देणारे एक पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे.

महापौरांना ‘शिवछत्रपतींची स्त्री निती’ हे पुस्तक मनसेकडून भेट म्ह‌णून पाठवण्यात आले आहे. ही भेट प्रत्यक्ष महापौरांनी स्वीकारली नाही. पण हे पुस्तक महापौरांच्या दालनाबाहेर जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठेवण्यात आले आहे. ‘महापौरांना भेट’ असा संदेश यावर लिहून ठेवला आहे. तसेच, या भेटीसोबत एक निवेदनही मनसेने महापौरांना दिले आहे. महापौरांनी आपल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

मुंबईचे तुम्ही प्रथम नागरिक-महापौर या संविधानिक पदावर विराजमान आहात. असे असूनही महिलेचा हात धरुन पिरगळणे अशोभनीय आणि असमर्थनीय कृत्य आहे. अशा कडक शब्दांत मनसेकडून महापौरांची कानउघडणी करण्यात आली आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आपण आहोत. महिलांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोठा मान-सन्मान होता. आपणही तसेच वागले पाहिजे. महापौरांच्या वर्तणुकीमुळे ते ‘शिवनिती’नुसार शिक्षेस पात्र आहेत. महापौरांनी केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत जाहीरपणे माफी मागावी आणि स्वतःचे आत्मपरिक्षण करावे.

Leave a Comment