असा आहे खिलाडी आणि मॅचो मॅनचा ‘दोस्ताना’


हिंदी सिनेसृष्टीत देसी बॉईज् म्हणून खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि मॅचो मॅन म्हणजे जॉन अब्राहमची ओळख आहे आणि त्याचबरोबर त्यांचा दोस्ताना देखील बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय असतो. पण यावेळेस यांच्या दोस्तीत कुस्ती होणार आहे कारण मागील वर्षीसारखीच यावर्षी देखील त्यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. असे असले तरी त्यांच्या दोस्तीत तसूभर देखील फरक पडणार नाही. कारण हे दोघेही त्यांचे व्यावसायिक आयुष्य बाजुला ठेवुन वैयक्तिक आयुष्यात आपली मैत्री जपत असतात. सोशल मीडियावर अक्षय आणि जॉनच्या याच मैत्रीचे उदाहरण देणारे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ हे दोन चित्रपट मागच्या वर्षी १५ ऑगस्टला रिलीज झाले होते. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर दोन्हीही चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. आता याहीवर्षी १५ ऑगस्टलाच दोघांचेही चित्रपट रिलीज होणार आहेत. आपआपल्या चित्रपटांचे दोघेही सोबतच प्रमोशन करत असल्यामुळे त्यांची मैत्री पाहून चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.


अक्षयने जॉनसोबतचा एक फोटो शेअर करुन त्यावर ‘मेक सम नॉईझ फॉर देसी बॉईझ’, असे कॅप्शन दिलेय. या फोटोवरही चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. अक्षय याबाबत बोलताना म्हणाला, की एकमेकांसोबत आम्ही काम करत नसलो तरीही एकमेकांसोबतच असतो. आमच्या मैत्रीचा खरा बॉन्ड ‘गरम मसाला’, ‘देसी बॉईझ’, ‘हाऊसफुल २’ या चित्रपटातूनही दिसला. आम्ही आमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल फार सकारात्मक विचार करतो. म्हणूनच येत्या स्वातंत्र्यदिनी दोघेही आपआपल्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहोत.

Leave a Comment