टोरांटो नॅशनल्स संघाने थकवले युवराज सिंहचे पैसे


नवी दिल्ली – युवराज सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धेत सध्या खेळतो आहे. युवराजने निवृत्तीनंतर बीसीसीआयकडे ग्लोबल टी-२०, कॅरेबियन प्रिमीअर लिगसारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी मागितली होती. टोरांटो नॅशनल्स संघाकडून ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धेत खेळणाऱ्या युवराज सिंह आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना पैसेच मिळत नसल्याचे समोर आले. युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी याचसाठी टोरांटो नॅशनल्स विरुद्ध मॉन्ट्रियल टायगर्सविरुद्ध सामन्यात खेळण्यास नकार दिला.

या संदर्भातील वृत्त ESPNCricinfo या क्रिडाविषयक संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार पैसे देईपर्यंत बसमध्ये बसणार नाही असा पवित्रा खेळाडूंनी घेतला. ज्यामुळे सामना सुरु होण्यास उशीरही झाला. आयोजकांनी यानंतर खेळाडूंशी चर्चा करत यामधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, पण या सामन्यात युवराजने न खेळणेच पसंत केले. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कराराप्रमाणे ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धेत अनेक खेळाडूंना पैसेच मिळाले नसल्यामुळे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय काही खेळाडूंनी घेतला आहे.

Leave a Comment