पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला?


काश्मिर मुद्द्यावर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. त्यासाठी पाकिस्तानने उचललेल्या तथाकथित कठोर पावलांना तोडीस तोड उत्तर देण्याचीही तयारी भारत सरकारने केली आहे. मात्र भारतीय कलाकारांच्या संघटनेनेही त्यात आपला सहभाग नोंदवला असून त्याचे स्वागत करायला हवे.

काश्मिरला विशेष दर्जा देणारे 370वे कलम भारताने रद्द केल्यावर पाकिस्तान बिथरणे स्वाभाविक होते. मग बिथरलेल्या पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताची कोंडी करायची म्हणून काही पावले उचलली. त्यात भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचाही समावेश आहे. हा पाकिस्तानचा नेहमीचाच पवित्रा आहे. गेल्या तीन वर्षांत त्या देशाने अशाप्रकारे दोनदा बंदी घातली आहे. मात्र पाकिस्तानमध्ये स्थानिक सिनेमांपेक्षा अधिक भारतीय सिनेमे पाहिले जातात. तसेच भारतीय कलाकारांची लोकप्रियता सुद्धा प्रचंड आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट तिथे एवढे लोकप्रिय आहेत की ते या बंदीला पुरून उरले आहेत. व्हिडिओ कॅसेटच्या जमान्यात भारतीय चित्रपटांचा पाकिस्तानात काळा बाजार होत असे. फार कशाला, गेल्या वर्षी झालेल्या संसदेच्या निवडणुकीत पाकिस्तान तहरीके-इंसाफ पार्टीच्या उमेदवाराने आपल्या प्रचाराच्या पोस्टरमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या छायाचित्रांचा वापर करून लोकांकडे मते मागितली होती.

त्यामुळे गुरुवारी पाकिस्तानने पुन्हा अशी बंदी घालण्याचे सूतोवाच केले तेव्हा त्यामुळे फारशी खळबळ उडाली नाही. परंतु गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटांमध्ये, विशेषतः बॉलिवूडमध्ये, वाढलेल्या पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा ऐरणीवर आला. पाकिस्तान सरकारने घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकार, मुत्सद्दी आणि पाकिस्तानशी संबंधित सर्व प्रकारच्या द्विपक्षीय संबंधांवर कडक बंदी घालण्याची मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (एआयसीडब्ल्यूए) केली.

पाकिस्तानी सरकारने भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याच्या संदर्भात चित्रपट क्षेत्रातील सर्व पाकिस्तानी कलाकार आणि संगीतकारांशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवण्याचा आग्रह एआयसीडब्ल्यूएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्यापार आणि द्विपक्षीय संबंधांच्या बाबत पाकिस्तानला कठोरपणे नकार द्यावा, अशी मागणी एआयसीडब्ल्यूएने केली आहे. एआयसीडब्ल्यूएचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या धाडसी निर्णयाबद्दल सरकारचे कौतुक केले आहे.

भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानची फूस आहे, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये पाकिस्तानविरोधात प्रचंड जनमत निर्माण झाले आहे. पाकिस्तानी खेळाडू, कलाकार आणि साहित्यिकांना देशात मोठ्या प्रमाणात विरोध होतो. खासकरून शिवसेनेसारखी संघटना यात आघाडीवर असते. यावर्षी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली. तेव्हाही फेडरेशन ऑफ वेस्टन इंडीया सिने एम्लाईज या संघटनेने पाकिस्तानी कलाकार व गायकांना बॉलीवूडमध्ये प्रवेश देणार नसल्याचे जाहीर केले होते. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचा पुळका असलेले पंजाबचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनाही बॉलीवूडमध्ये प्रवेश बंदी करण्याचा विचार ‘फेडरेशन ऑफ वेस्टन इंडीया सिने एम्लाईजने’ बोलून दाखवला होता.

पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांनी गेल्या वर्षी उरी येथे भारताच्या लष्करी तळावर हल्ला केला होता. त्यावेळीही पाकिस्तानी कलावंतांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उमटला होता. पाकिस्तांनी कलाकार असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार आणि निदर्शने करण्याचीही तयारी अनेक संघटनांनी केली होती. पाकिस्तानातील चित्रपटगृहांच्या मालकांनीही त्यावेळी भारतीय चित्रपटांवर बहिष्कार टाकला होता. मात्र थोड्याच काळानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला.

पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात भारतात इतका संताप असण्याचे कारण म्हणजे या कलाकारांची कृतघ्न वृत्ती. वीणा मलिक असो किंवा फवाद खान – अशा अनेक कलाकारांनी येथे येऊन, हिंदी चित्रपटांत पैसा कमावून परत भारतावरच दुगाण्या झाडल्या आहेत. आताही पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अतिफ असलम याने भारतावर आगपाखड केली आहे. “अल्लाह काश्मीर आणि जगातील सर्व निष्पाप यांची रक्षा करो. काश्मिरींसमवेत होत असलेला अत्याचार आणि शोषण यांचा मी निषेध करतो,” असे ट्वीट त्याने केले आहे. याच अतिफ असलमने काही भारतीय चित्रपटांतही गाणी गायली आहेत. यांच्या अशा कृतघ्न वृत्तीमुळे त्यांना कठोर धडा शिकवावा, असे भारतीयांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच खाल्ल्या घरचे वासे मोजणारे हे पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला, असा प्रश्न उपस्थित राहतो. एआयसीडब्ल्यूएच्या निमित्ताने हाच प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे, इतकेच.

Leave a Comment