या स्वातंत्र्यदिनी लेहमध्ये लेफ्टनंट धोनीच्या हस्ते ध्वजारोहण


नवी दिल्ली – क्रिकेटपासून २ महिन्यांची विश्रांती घेत भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली. १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा (पॅरा) धोनी सदस्य असून ३१ जुलै पासून तो बटालियनच्या जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत आहे. आता अजून एक अंदाजात धोनी दिसणार आहे. तो लेह येथे या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणार आहे.

याबाबत माहिती देताना सैन्याच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, धोनी भारतीय सैन्याचा ब्रँड अँम्बॅसडर आहे. आपल्या युनिटच्या सर्व सहकाऱ्यांना तो नेहमी प्रेरित करत असतो. नेहमी जवानांबरोबर तो फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळत असतो आणि तो सर्वांसोबत सरावही करतो. १५ ऑगस्टपर्यंत धोनी येथे थांबणार आहे.

भारतीय सेनेने २०११ साली धोनीला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान दिला होता. धोनीशिवाय, अभिनव बिंद्रा आणि दीपक राव यांनाही हा सन्मान देण्यात आला होता. धोनीने २०१५ साली याचे प्रशिक्षणही घेतले आणि पॅराट्रुपरची पात्रता मिळवली. आग्रा येथील प्रशिक्षण केंद्रावर सेनेच्या विमानातून धोनीने ५ वेळा विमानातून उडी घेतली होती.

Leave a Comment