आमच्या अंतर्गत प्रश्नांबाबत पाकने ढवळाढवळ करु नये


नवी दिल्ली – पाकिस्तानने भारताशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडल्यावरून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० चा निर्णय ही आमची देशांतर्गत बाब असून त्यावर पाकिस्तानने ढवळाढवळ करण्याचा संबंधच येत नाही. जगासमोर विनाकारण पाकिस्तान कांगावा करून दाखवत आहे. तसेच, पाकिस्तानकडून भारताशी असलेले द्विपक्षीय संबंध चिंताजनक स्थितीत पोहोचल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताने जम्मू-काश्मीरविषयी घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तान सध्या बेचैन झाला आहे. एकामागोमाग एक भारतविरोधी निर्णय पाककडून घेतले जात आहेत. पाकमध्ये भारतीय चित्रपटांवरही बंदी आणली आहे. पण, भारतीय संविधानानुसार, हा भारताचा अंतर्गत विषय होता आणि पुढेही राहील. भारताशी असलेल्या द्विपक्षीय संबंधांविषयी चिंताजनक चित्र तयार करून आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा पाकचा कावा कधीही यशस्वी ठरणार नाही,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकला ठणकावून सांगितले आहे.

Leave a Comment