एकाच रात्रीत स्टार झालेल्या गायिका ‘रानू दी’चा मेकओव्हर


एक महिला गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर करत होती. या महिलेचे नाव रानू मंडाल असे असून सोशल मीडियावर त्यांचा गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील ये प्यार का नगमा है.. हे गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला फेसबुकवरुन मोठ्या प्रमाणात शेअर्स मिळाल्याने रानू दी यांनी रातोरात प्रत्येकाच्या मोबाईल अन् मनामध्ये आपले स्थान मिळवले होते.

एका तरुणाने अतिशय हालाखीच्या परिस्थितीत, जगण्यासाठी दैनिक संघर्ष करणाऱ्या रानू दी यांचा व्हिडीओ शुट करुन फेसबुकवर अपलोड केला होता. त्यामुळे, जगासमोर रोजच्या रोजीरोटीसाठी झगडणाऱ्या रानू दी यांचे टॅलेंट आले. काही वेळातच आपल्या मधूर आवाजातील त्यांची गाणी सर्वत्र व्हायरल होऊ लागल्यामुळे म्युझिक कंपन्यांचीही रानू दी यांच्यावर नजर पडली. म्हणूनच, रानू मंडाल यांना कोलकाता, मुंबई, केरळ, बांग्लादेश येथून गाण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. तर, मुंबईतील एका रिअॅलिटी शोमध्येही ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. रानू यांचा त्यासाठी मेकओव्हर करण्यात आला आहे.

संबंधित कंपनीकडून रानू यांचा प्रवासखर्च आणि इतर फॉर्मेलिटीही करण्यात येत आहे. पण ओळखपत्र रानू यांच्याकडे नसल्याने काही अडचणी येत असल्याचे समजते. कदाचित, रानू दी यांना सा रे ग म प या शोमधून बोलावणे आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, रानू यांचा बाबू मंडल यांच्याशी विवाह झाला होता. पण त्या पतीच्या निधनानंतर रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन लोकांचे मनोरंजन करत आपली भूक भागवत होत्या.

रानू दी मळकट कपडे, राबलेला चेहरा, विस्कटलेले केस या पेहरावातून आता उच्च भ्रू महिलांप्रमाणे नटून-थटून जगासमोर आल्या आहेत. सोशल मीडियावर रानू दी यांचे हे फोटोही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, एका ब्युटी पार्लरमध्ये त्यांचा मेकअप करण्यात येत असल्याचे दिसून येते. रानू दी यांचे नशिब सोशल मीडियामुळे पालटले असून आता त्यांना अच्छे दिन आले आहेत.

Leave a Comment