टी-२० सामन्यात आफ्रिकेच्या फिरकीपटूने १८ धावांत टिपले ७ बळी


नुकतीच वेस्ट इंडिजविरूद्धची टी-२० मालिका भारतीय संघाने जिंकली. भारताने या मालिकेत वेस्ट इंडिजला चारी मुंड्या चीत करत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. फलंदाज आणि गोलंदाज यांनी या मालिकेत दमदार कामगिरी करत अनेक विक्रम मोडले तर आपल्या नावे काही नवे विक्रम देखील केले. पण आफ्रिकेच्या एका फिरकीपटूने एका टी २० लीग स्पर्धेत त्यापेक्षाही भन्नाट कामगिरी केली.


टी २० क्रिकेटमध्ये गुरुवारी कोणालाही न जमलेली कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा २८ वर्षाचा गोलंदाज कॉलीन अ‍ॅकरमन याने करून दाखवली. त्याने व्हायटॅलिटी ब्लास्ट टी २० लीगमध्ये लेसेस्टरशायर क्लबकडून खेळताना विश्वविक्रमी कामगिरी केली. बर्मिंगहॅम बेअर्स संघाचा संपूर्ण डाव लेसेस्टर क्लबच्या ६ बाद १८९ धावांचा पाठलाग करताना केवळ १३४ धावांमध्ये आटोपला. कॉलीनने लेसेस्टरच्या या विजयात अभूतपूर्व कामगिरी केली. ४ षटकांच्या स्पेलमध्ये त्याने केवळ १८ धावा दिल्या आणि तब्बल ७ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

त्याची टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. हा विक्रम या आधी सोमरसेटच्या अ‍ॅरूल सुफीया याच्या नावावर होता. २०११ मध्ये ग्लॅमोर्गन क्लबविरुद्ध त्याने ५ धावांत ६ बळी टिपले होते. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी हा विक्रम मोडला गेला. या विजयासह लेसेस्टरशायरने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.

Leave a Comment