दीपिकाने करिअरच्याबाबतीत घेतला महत्वाचा निर्णय


अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo या मोहिमेअंतर्गंत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण कलाविश्वामध्ये चांगलेच गाजले. अनेक महिलांनी या मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचीही नावे यामध्ये समोर आली. काही काळानंतर प्रचंड चर्चेत आलेले हे प्रकरण थांबले. पण यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय बॉलीवूडची डिंपल गर्ल म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोणने घेतला आहे.

ज्या कलाकारांवर #MeToo अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत, अशा व्यक्तींसोबत चित्रपटात काम न करण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. दीपिकाने काही दिवसापूर्वी दिग्दर्शक लव रंजन यांचा आगामी चित्रपटासाठी होकार कळविला होता. त्यानंतर #NotMyDeepika हा हॅशटॅग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. #MeToo मोहिमेअंतर्गत लव रंजन यांच्यावरदेखील लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते, त्यामुळे हा हॅशटॅग व्हायरल झाला होता.

नुकतेच वोग मासिकासाठी दीपिकाने एक मुलाखत दिली होती. दीपिकाने हा महत्वाचा निर्णय या मुलाखतीत बोलताना घेतल्याचे सांगितले. कोणत्या व्यक्तींसोबत तूला चित्रपटामध्ये काम करायला आवडणार नाही, असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला होता. दीपिकाने त्यावर उत्तर देताना हा निर्णय सांगितला. लैंगिक शोषणाचे आरोप ज्या व्यक्तीवर करण्यात आले आहेत, मी अशा व्यक्तीसोबत कधीही काम करणार नसल्याचे दीपिका म्हणाली.

Leave a Comment