का बरे दीपिकाने सलमानला सुनावले?


चार वर्षांपूर्वी आपण डिप्रेशनने असल्याची कबुली बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिल्यानंतर अभिनेता सलमान खानने गेल्या वर्षी डिप्रेशनबाबत केलेल्या कमेंटवरुन दीपिकाने आता त्याला सुनावले आहे. कोणी स्वतःहून डिप्रेशन निवडत नसल्याचे म्हणत दीपिकाने सलमानला खरमरीत उत्तर दिले आहे.

दीपिकाने ‘वोग’ मासिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. कोणी स्वतःहून डिप्रेशन निवडत नाही. नैराश्याने ग्रासणे म्हणजे दुःखी असणे, अशी गल्लत सामान्य लोकांची होते. एका पुरुष कलाकाराने डिप्रेस्ड राहण्याची विलासीनता परवडू शकत नसल्याचे म्हटले होते. जणू तुमची काय डिप्रेशन ही चॉईस आहे, अशा शब्दात दीपिकाने सलमानचा समाचार घेतला.

सलमान फेब्रुवारी 2018 मध्ये TiE ग्लोबल समीटमध्ये बोलत होता. हल्ली खूप जणांना मी निराश (डिप्रेस्ड) आणि भावनिक झालेले पाहतो. पण डिप्रेस्ड राहण्याची किंवा दुःखी असण्याची किंवा भावनिक होण्याची विलासीनता मला परवडू शकत नाही. कारण ते माझ्या पथ्यावर पडत नसल्याचे सलमान म्हणाला होता.

गेल्या वर्षी सलमानने डिप्रेशनवर केलेल्या भाष्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ट्विटराईट्सनी सलमानवर टीका केली होती. दीपिकाने 2015 मध्ये मी डिप्रेशनने पछाडले होते, अशी कबुली दिली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये ती याबाबत मोकळेपणाने बोलली होती. डिप्रेशन म्हणेज चैनीची गोष्ट समजली जाते. ज्यांच्याकडे पुष्कळ पैसा-अडका आहे, ते डिप्रेशनमध्ये जातात, असा सर्वसामान्य समज आहे. पण हा मिथक मोडण्याची गरज असल्याचे दीपिका म्हणाली होती.

नैराश्याबाबत दीपिकाने मोकळेपणाने दिलेल्या कबुलीमुळे अनेक जणांना या मानसिक आजाराबद्दल बोलण्याचे धाडस मिळाले होते. सध्या अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित, मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका मुख्य भूमिका साकारत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment