सावधान- इस्लामिक स्टेट भारतात वाढतेय!


इस्लामिक स्टेट (इसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन बातम्यांमुळे मूळ केरळच्या असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे या संघटनेची पाळेमुळे भारतात पसरल्याची शंका वाढली आहे.

पहिली बातमी मुहम्मद मुहसिन या दहशतवाद्याची. हा तरुण मूळ केरळमधील. मलप्पुरम जिल्ह्यातील इडप्पल या गावचा रहिवासी. ऑक्टोबर 2017 मध्ये तो इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेला होता. तो अफगाणिस्थानात लढत होता आणि तिथेच 18 जुलै रोजी अमेरिकी ड्रोननी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत इस्लामिक स्टेटचा एक अन्य कमांडर हुजैफा-अल-बकिस्तानी हाही मारला गेला. मुहम्मद मुहसिन याच्या नातेवाईकांना त्याच्या मृत्यूची खबर एका व्हाट्सअप संदेशातून मिळाली.

मुहासिनच्या मृत्यूची बातमी आली त्याच्याच आगेमागे केरळमधील यास्मीन महंमद जाहिद या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावल्याचीही बातमी आली होती. इसिसशी संबंध असल्यामुळे यास्मीनला ही शिक्षा देण्यात आली. या महिलेचा कोणत्याही दहशतवादी कारवायांत सहभाग नसला, तरी इसिसच्या विचारांनुसार गैर-मुस्लिमांशी युद्ध करण्याचे आवाहन केले म्हणून तिला शिक्षा देण्यात आली. यासीन हिचा एक ‘व्हिडिओ’ पुरावा म्हणून न्यायालयाला सादर करण्यात आला होता. यात ती उघडपणे मुसलमानेतरांशी युद्ध करण्याचे आवाहन करतांना दिसत होती. यासीन हिचा एक ‘व्हिडिओ’ पुरावा म्हणून न्यायालयाला सादर करण्यात आला होता. इसिसमध्ये सामील होण्यासाठी मुलांसह अफगाणिस्तानला जातांना यास्मीनला पोलिसांनी 2016 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक केली होती. यास्मीनचा पती आणि अन्य काही जण यापूर्वीच अफगाणिस्तानात पळाले आहेत.

यामुळे इसिसमध्ये भारतीयांच्या वाढत्या संख्येचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. भारतात इसिसचे अस्तित्व आणि शक्ती यांबद्दल अनेक अनुमान करण्यात येतात. मात्र या संघटनेत सामील होऊ पाहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येबाबत एकमत नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, अशा व्यक्तींची संख्या 108 आहे आणि दर महिन्याला त्यात सुधारणा केली जाते. मंत्राया नावाच्या एका लष्करी संशोधन संस्थेने विविध स्त्रोतांकडून एकत्रित केलेली माहितीवरून अशा व्यक्तींची संख्या 200 च्या घरात असल्याचे म्हटले आहे. यातील अनेक जणांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराक किंवा सिरियाला जाण्याचा प्रयत्न करत असताना रोखण्यात आले होते. त्यापैकी काहींना त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या कुटुंबियांना परत पाठविण्यात आले. मात्र काही जणांना त्यांच्या कट्टरपंथी विचारांच्या पातळीनुसार अटक करण्यात आली. भारतात 18 कोटी मुस्लिम राहतात आणि इसिसमध्ये सामील झालेल्यांची संख्या त्या तुलनेत अगदी किरकोळ आहे, मात्र सुरक्षा संस्थांसाठी आव्हान निर्माण करण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे.

इसिसच्या अमाक न्यूज एजन्सी या वृत्तसंस्थेने 10 मे 2019 रोजी दावा केला होता, की तिने “विलाय ऑफ हिंद” (भारतातील प्रांत) स्थापित केला आहे. विशेष म्हणजे भारतात काश्मिर हे राज्य दहशतवादाने सर्वाधिक ग्रस्त आहे. मात्र इसिसला भारतात काश्मीरच्या बाहेरच मोठे यश मिळाले आहे.
इसिसने आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सर्वच भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. मात्र केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये संघटनेला जास्त यश मिळाले आहे. त्यातही केरळमध्ये खासच! गेल्या काही वर्षांत केरळमधील 98 तरुण इसिसमध्ये भरती झाल्याचे सांगण्यात येते. यातील 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 जण अजूनही जीवंत आहेत. इसिसमध्ये सामील होणाऱ्यांपैकी एकट्या कन्नूर जिल्ह्यातील 40 जण आहेत, असे सरकारी अङवालांमध्ये म्हटले आहे.

कन्नूर व्यतिरिक्त कासारगोड, कोळिकोड, मलप्पुरम, पलक्कड़, एर्नाकुलम आणि तृशूर या भागांतील अनेक जणही इसिसमध्ये गेले आहेत. यातील बहुतेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून या संघटनेकडे ओढले गेले होते. इसिसशी सहानुभूति असणारी अनेक सोशल मीडिया खाती मलयाळी भाषांतून चालतात आणि ती आखाती देशांतून चालवण्यात येतात. विशेषतः केरळमधील मुस्लिमांवर ते आपले जाळे टाकतात, असे गुप्तचर खात्याच्या अहवालात म्हटले आहे.

इसिसने सीरियात आपली खिलाफत (राज्य) स्थापन झाल्याची घोषणा 2014 मध्ये केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील चार जणांनी इसिसमध्ये सामील होण्यासाठी पलायन केले होते. भारतीयांनी इसिसमध्ये जाण्याची ही पहिली घटना होती. त्यानंतरची जवळपास 90 टक्के भरती ही केरळमधून झाली होती. आखाती देशांशी असलेला जास्त संपर्क, सौदी अरेबियाच्या प्रभावाखालील वहाबी पंथाचा प्रसार आणि देशांतर्गत इस्लामी राजकीय पक्षांचा प्रभाव यामुळे केरळमध्ये इसिसचा प्रभाव वाढल्याचे मानले जाते.

परंतु केरळच नाही तर अन्य राज्यांतही इसिस हातपाय पसरतेय. भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इसिसशी संबंधित किमान 23 प्रकरणांची चौकशी सुरू केली असून यासंबंधात अंदाजे 100 लोकांना अटक केली आहे. डिसेंबर 2018 पासून आतापर्यंत 23 संशयितांना महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि केरळ येथून अटक करण्यात आली आहे. भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये पसरलेल्या इसिसच्या जाळयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने ही एक नवीच चिंता निर्माण झाली आहे.

Leave a Comment