मानधनाच्या बाबतीत प्रभासने या दिग्गज मंडळींनाही टाकले मागे


बाहुबलीला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर अभिनेता प्रभास हा आगामी साहो या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये देखील कमालीची उत्सुकता आहे. प्रभाससोबत या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट २०१९मधील बिग बजेट चित्रपट ठरला असल्यामुळे प्रभासने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या संदर्भातील वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी प्रभासने सर्वात जास्त मानधन घेतले असून तो आता इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधान घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटासाठी प्रभासने जवळपास १०० कोटींचे मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. सलमान खान, शाहरुख खान आणि रजनीकांत यांना देखील त्याने मानधनाच्याबाबतीत मागे टाकले आहे. तसेच ‘साहो’ चित्रपटाच्या प्री-रिलीज बिझनेसचा ५० टक्के हिस्सा प्रभास घेणार असल्याच्यादेखील चर्चा सुरु आहेत.

श्रद्धा कपूर या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान श्रद्धाने या चित्रपटासाठी ७ कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर हे कलाकार देखील चित्रपटात झळकणार आहेत. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. येत्या ३० ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment