ईदला हरवा चमडा माफियाला – इस्लामी विद्वानांचे आवाहन


मुस्लिम धर्मियांसाठी महत्त्वाचा असलेला ईद-उल-जुहा हा सण या महिन्यात आहे. मात्र यंदाचा हा ईद-उल-जुहा सण काहीसा वेगळा ठरणार आहे. कारण या ईदच्या दिवशी बळी दिलेल्या जनावरांची चामडी नंतर वापरात येणार नाही. ती त्याच दिवशी नष्ट करण्याचे आवाहन इस्लामी विद्वानांनीच केले आहे.

इस्लामी विद्वानांनी संपूर्ण मुस्लिम समुदायाला आवाहन केले आहे, की जनावरांचा बळी दिल्यानंतर त्यांची चामडी नष्ट करून टाका. जेव्हा लोक ईदच्या निमित्ताने शेळी, बकरी किंवा अन्य प्राण्यांचा बळी देतात तेव्हा त्याची चामडी मदरशांना दान देतात. हे मदरसे ही चामडी व्यावसायिकांना विकतात आणि त्यातून मदरशांचा खर्च चालतो, असे सांगितले जाते. मात्र हे माहीत असल्यामुळेच व्यावसायिक मंडळी जाणूनबुजून ईदच्या आधी चामडीच्या किमती पाडतात, असा त्यांच्यावर मदरशांकडून आरोप केला जातो. यामुळे मदरशांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.

ही किंमत कमी होण्याचे प्रमाण इतके मोठे आहे, की 400 रुपयांमध्ये विकली जाणारी चामडी 30 रुपयांनी विकली जाते. यामुळे मदरशांचा प्रचंड तोटा होतो. चामडीचा पुरवठा कमी झाला म्हणजे तिची किंमत पुन्हा वाढेल, असे गणि या मागणीमागे आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि मशिदींच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोचवला जात आहे.

इस्लाम धर्मात रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी ईद-उल-जुहा येते. हिलाच बकरी ईद असेही म्हटले जाते. बकरी ईद ही ईद-उल-फितर नंतर मुस्लिम समुदायातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण आहे. या दिवशी आपल्याजवळील प्रिय वस्तू अल्लाला दान करण्याची प्रथा आहे. खासकरून मुस्लिम बांधवांमध्ये चार पाय असलेल्या जनावरांची कुर्बानी (बळी) देण्याची प्रथा आहे. विविध देशांमध्ये विविध रिवाज असून त्यानुसार कोणी बकरा, कोणी ऊंट तर काही देशांमध्ये म्हशीचासुद्धा बळी दिला जातो. भारतात मात्र बहुतांश भागात बकराच कुर्बान केला जातो. कुर्बानी दिल्यानंतर बकऱ्याच्या मांसाचे समान तीन भाग केले जातात. त्यानंतर या मांसातील एक भाग गोरगरीब व अनाथांना दिला जातो, दुसरा भाग जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी आणि तिसरा भाग स्वत:साठी व शेजाऱ्यांना दिला जातो.

भारतात ईद-उल-जुहा सणाच्या निमित्ताने दरवर्षी तीन कोटी शेळी-बकऱ्यांचा बळी दिला जातो. त्यानंतर त्यांची सोललेली चामडी मदरशांना दान दिली जाते. ईदच्या काळात चामड्याच्या विक्रीतून सुमारे 1200 कोटी रुपये मिळतात, असे चामड्याचे व्यापारी मोहम्मद सलीम यांनी वृत्तसंस्थांना सांगितले. मात्र 2014 सालानंतर ऐन ईदच्या आधी चामड्याच्या किमती उतरण्याचा कल आढळला आहे. त्यामुळे मदरशांना 150 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळत नाहीत.

गेल्या 20 जुलै रोजी भिवंडीत या संदर्भात विद्वानांची एक बैठक झाली होती. जमीयत-उल-हिंद, जमात-ए-इस्लामी हिंदी, एहले हदीस आणि तबलीग जमात अशा अनेक संघटनांच्या तज्ञांनी यात भाग घेतला होता. यातील काही लोकांनी या मागणीला विरोधही केला होता. चामडी नष्ट करण्याचे आवाहन लोकांना करू नये कारण त्यामुळे मदरशांनाच तोटा होईल, असे अनेक विद्वानांचे मत असल्याचे जमीयत-उल-उलेमा-ए-हिंदचे मुफ्ती सईद मोहम्मद हुजैफा काजमी यांनी सांगितले. मदरशांच्या दबावामुळे 20 तारखेच्या बैठकीत अनेक नेत्यांनी आपला निर्णय बदलला, असे भिवंडीचे माजी आमदार अब्दुल रशीद ताहिर मोमीन यांनी सांगितले. या संदर्भात निदर्शने करू नयेत, असा फतवा जामिया निझामिया मुस्लिमांच्या प्रमुख संस्थेने काढला होता. मात्र हैद्राबादमधील अनेक विद्वान या फतव्याचे उल्लंघन करण्यास तयार आहेत. चमडा माफियाला विरोध केला नाही तर मदरशांचे मोठे नुकसान होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment