जम्मू काश्मिरचे दोन्ही माजी मुख्यमंत्री नजरकैदेत


नवी दिल्ली – रविवारी मध्यरात्रीपासून जम्मू -काश्मीरमध्ये जमावबंदीसाठी असलेले कलम १४४ लागू करण्यात आले असून दरम्यान या ठिकाणची फोन, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी काश्मीरमधील राजकीय घडामोडींबाबत बैठक बोलवण्यात आली होती. ही कारवाई या बैठकीनंतर करण्यात आली आहे.

दरम्यान मेहबुबा मुफ्ती यांनी नजरकैदेच्या कारवाईवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. शांतीच्या मार्गाने जाणारे आम्ही नेते असून आमच्या घरात आम्हाला नजरकैदेत ठेवले जाणे ही बाब निषेधार्ह असल्याचे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. त्याचबरोबर आपल्याला आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण झाल्याचे म्हणत मोदी सरकारवर त्यांनी टीका केली आहे. तर या कारवाईचा ओमर अब्दुल्ला यांनीही निषेध करत आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, आज आम्हाला ठाऊक नाही, पण काश्मीरच्या जनतेला आम्ही कायम शांततेचे आवाहन करत असल्याचे ट्विट केले आहे.

Leave a Comment