छोट्याश्या मडावग गावाची सफरचंदातून करोडोंची कमाई


हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला पासून ९२ किमीवर असलेले अवघे १८०० लोकवस्तीचे गाव आशियातील श्रीमंत गावांच्या यादीत विराजमान झाले आहे. या छोट्याश्या गावात दरवर्षी १५० कोटींहून अधिक कमाई केली जाते आणि येथील प्रत्येक परिवाराचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७० ते ७५ लाख रुपये आहे. ही सारी किमया घडविली आहे ती येथे पिकविल्या जात असलेल्या सफरचंदानी.

यंदा या गावात ७ लाख पेट्या सफरचंद उत्पादन अपेक्षित आहे. विशेष म्हणजे १९८० च्या दशकात येथे सफरचंद नव्हते. समुद्रसपाटीपासून ७७७४ फुट उंचीवर असलेल्या या छोट्या गावात बटाटे पिकत असत. मात्र एकदा एक शेतकरी बटाटे विकण्यासाठी सिमल्याला घेऊन गेला आणि येताना त्याने सफरचंदाची रोपे आणली. पण ती लावण्यास कुणी तयार होत नव्हते. १९९० मध्ये शेतकरी हिरासिंग डोगरा यांनी प्रथम सफरचंदाची रोपे लावली आणि ती लागवड यशस्वी झाल्यावर गावातील सर्वांनी सफरचंद लागवड केली त्याचे उत्तम परिणाम आता दिसू लागले आहेत. संपूर्ण गावात सफरचंदाचा बागा आहेत. या बागांची काळजी लहान मुलासारखी घेतली जाते.


येथील सफरचंदे अतिशय उत्तम गुणवत्तेची, मोठ्या आकाराची आणि दीर्घ काळ चांगली टिकणारी आहेत. येथून दरवर्षी १२ ते १५ लाख बॉक्स निर्यात केले जातात. येथे बर्फ खूप पडतो त्यामुळे सफरचंदाची क्वालिटी उत्तम आहे. थंडीत शून्य डिग्रीच्या खाली तापमान जाते तेव्हा झाडे कपड्याने झाकली जातात आणि एप्रिल ते ऑगस्ट सप्टेंबर या काळात सफरचंदे तोडीसाठी तयार होतात. या काळात गारा पडल्या तर फळांचे नुकसान होऊ नये म्हणून बागांवर नेट लावले जाते. दरवर्षी सरासरी १५० कोटी रुपयांची कमाई हे गाव केवळ सफरचंद विक्रीतून करते.

Leave a Comment